अग्रलेख

पुन्हा तेच !


काल नागपुरात एका कार्यक्रमात राज्याचे विरोधीपक्षनेते देवेन्द्रजी फडणवीस पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय नैतिकता आणि शुचित्वावर घसरले.हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होता.त्यात त्यांनी राष्ट्रवादीशी साखरपुडा होऊन लग्न मोडल्याचा किस्सा सांगीतला,आणि सोयऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.पण दुसऱ्यासाठी खड्डा खोदता खोदता जीभ घसरून ते स्वतःच त्या खड्यात तोंडघशी पडले.इतके की त्यांना फेस दाखवायला जागा उरली नाही.सोशल मीडियावरील भाजपा सेलला हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम अचानक बंद करावा लागला आणि लिंकही डिलीट करावी लागली.फडणवीस बोललेच तसे.त्या रात्री आणीबाणी उठवण्याचा दराफ्ट मीच लिहून दिला होता असे फडणवीस म्हणाले.त्यांच्या या वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल होऊ शकतो.कारण जर असे घडले असेल तर तो घटनात्मक संकेताचा तसेच पद आणि गोपनीयतेचा भंग आहे.आणि त्याची जबाबदारी राज्यपालांवर जाते.म्हणूनच हबकलेल्या भाजप मीडिया सेलने फडणवीसांचे ते फेसबुक लाईव्ह तातडीने थांबवले.डिलीट केले,त्याची लिंक हटवली.पण बाण सुटला आहे,तो परत येणार नाही. या कार्यक्रमात फडणवीस पुन्हा ओकलेच.फडणवीसांना आमची एक सल्ला वजा विनंती आहे.पोटात साठलेलं जे काही गरळ आहे,उद्धव ठाकरें विषयी.अजित पवारांविषयी,शरद पवारांच्या बद्दल.ते ओकून टाका ना एकदाचं.सगळंच्या सगळं,आणि सरळ.तुम्हाला हेच म्हणायचंय ना की राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी सत्ता स्थापनेची बोलणी करण्याआधी भाजपशी सुद्धा संधान बांधले होते.कबूल.त्यात लपवण्यासारखे आहेच काय ? पुलोद प्रयोगाच्या वेळीही होताच की तुमच्या दिव्याखाली अंधार,आणि मोरारजींच्या जनता सरकारातही होतातच की तुम्ही.जाऊद्या जुना इतिहास जाऊद्या.अगदी अलीकडे तुम्ही काश्मिरात चक्क महेबुबा मुफ्तीच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीशी लेखी निकाह करून नंतर तोंडी तलाकही दिला.तुम्हाला सत्तेसाठी जनता दलाचे नितीश कुमार चालतात.चंद्राबाबू चालतात,दिवंगत जय ललिता चालत होत्या.इतकेच काय वाजपेयीचं तेरा दिवसांचं सरकार का पडलं ते आठवा,त्यावेळी तर मायावतींशी आणि मुलायमसिंह यादवांशीही गाठ मारली होतीत.तुम्हाला विश्वनाथ प्रतापसिंह चालले.दावेही चालले.तुम्ही वाल्याचे वाल्मिकी करून घेता.तेही चालतं.तुम्ही डझनांनी पक्ष फोडता,आमदार-खासदार खरेदी करता.तेही चालतं.मग समजा शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची बोलणी  सुरु असताना साधले असेल भाजपशी संधान तर त्यात काय बिघडले ? काही पाप थोडेच केले.राजकारणात हे चालतेच.प्रसंग पाहून शत्रूशीही तह-करार-मदार करावे लागतात.राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.उलट शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी राजकारणाची खेळी असते.तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ती नवी नाही.मग का उगाच शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने बोटे मोडता.शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसाठी पुरोगामीत्व सोडायला निघाला होता म्हणून बोंबाबोंब करताय कशाला ? मंत्रिमंडळ ठरले होते,पालक मंत्रीही ठरले होते,म्हणे.ठरले असेल ना.त्यात काय नवल.साखरपुडा होऊन लग्न मोडलं.म्हणून काय सोयऱ्यांची बदनामी कराल ? या गडबडीत तुम्ही अजित दादांना फितवून रात्रीचा पाट लावलात.साडेतीन दिवसात नवरी दागिन्यांसह पळाली,त्या फजितीचं करा ना एकदा फेसबुक लाईव्ह.काल ओकता ओकता तुम्ही भलतंच ओकलात.महाराष्ट्रातली आणीबाणी उठवण्याचा दराफ्ट मीच लिहिला असे तुम्ही जाहीरपणे सांगून टाकले.अहो तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात ना,एकदा पाच वर्ष आणि दुसऱ्यांदा पुन्हा येऊन साडेतीन दिवस मुख्यमंत्री राहिलेला आहात.तुम्हाला एवढी साधी कायद्याची बात माहिती नाही,की आणीबाणी उठवण्याची शिफारस राज्यपालांनी राष्ट्रपतींना करायची असते आणि त्याचा लिखित मसुदा राज्याचे महाधिवक्ता लिहीत असतात.ही अत्यंत गोपनीय बाब असते.कोणत्याच पदावर नसलेल्या एका आमदाराला,तो माजी मुख्यमंत्री असला तरी हे पत्र दाखवणे सोडाच,त्या संबंधी माहितीही देता येत नाही.असे घडले असेल तर तो केवळ औचित्याचा नव्हे कायद्याचा भंग आहे.राज्यपाल कोश्यारींनी जर असे केले असेल तर हा महाभियोगाचा गुन्हा आहे.बोलता बोलता तुम्ही कदाचित खरे बोलून गेलात,पण त्यामुळे तुम्ही स्वतः,राज्यपाल कोश्यारी आणि तुमचा पक्ष देखील अडचणीत आलाय.हे मुद्दाम केलेत की जाणूनबुजून ?

रवींद्र तहकीक

7888030472