खट्टा मिठा

ह.भ.प.पाशा बुआ पटेल
 यांचे बांबू आख्यान

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने दर सप्ताहाला वार्तालाप नावाचा एक अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात येतो.या कार्यक्रमाला आजवर राजकीय,सामाजिक तसेच संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे.(ज्यांनी लावली नाही त्यांची पत्रकारांनी कडक शब्दात हजेरीही घेतलेली आहे)आगामी काळातही शिक्षण,क्रीडा,कला,सहकार,उद्योग,शेती आदी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वार्तालाप कार्यक्रमात बोलावून त्यांच्याशी संवाद करण्याचा मानस असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी सांगितले.निमंत्रित व्यक्तीचा परिचय,चर्चेचा विषय आणि प्रश्नोत्तरे असे या कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे.आज मात्र (दि.१८ डिसेंबर,गुरुवार) हा पायंडा मोडून भाजप प्रवक्ते पाशा पटेल यांनी सुमारे चाळीस पत्रकारांना जवळपास तासभर चक्क बांबू आख्यान ऐकवले.खरे तर आज त्यांच्याशी केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि दिल्लीत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वार्तालाप व्हावा अशी सर्वांची अपेक्षा होती.परंतु ह.भ.प .पाशा बुवांनी कोणाला बोलूच दिले नाही.आल्या आल्या त्यांनी जो बांबू रोवला आणि त्यावर चढले ते अखेरपर्यंत खाली उतरलेच नाहीत.बांबू एके बांबू,बांबू दुणे बांबू,बांबू पंचे दाहो-दरशे.बांबूचे दर,बांबूचे मार्केट,बांबूच्या जाती,बांबूचे उपयोग,बांबूची गरज,बांबूचे महत्व,बांबूचे फायदे, इत्यादी इत्यादी.पाशा बुवांनी बरीच उद्बोधक माहिती सांगितली.बांबू बद्दल किती सांगू आणि किती नाही असे त्यांना झाले होते.आम्हाला तर क्षणभर वाटले,बुवा आता ‘उर्वरित आयुष्य आता बांबू साठी समर्पित करीन,जगेन तर बांबू साठी,मरेन तर…’अशी काही घोषणा करतात की काय.बांबूचे उपयोग सांगताना त्यांना इतके अनावर झाले की ओघाओघात त्यांनी बांबू पासून लोणची आणि बिस्किटे बनतात अशीही लोणकढी ठोकून दिली.आम्हाला तर वाटले बुवा आता बांबूची भजी सुद्धा होतात म्हणून न सांगोत. ( प्रभू गोरे यांनी टोकल्यावर बुवा जरा गोरेमोरे झाले,पण आख्यान रेटलेच).थोडक्यात पाशा बुवा आज पत्रकारांना ‘बांबू’देऊन गेले.दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबद्दल आणि केंद्राच्या तीन कृषी कायद्या बद्दलच्या प्रश्नांना त्यांनी जाणीवपूर्वक ठरवून अक्षरशः बांबूवर कोलले.पाशाभाई खरेच असे नव्हते.शेतकरी चळवळीतला हा खंदा वीर.गोपीनाथ मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारा शेतकऱ्यांचा आसूड.बोलायला लागला की ताशा सारखा कडकडायचा.पण नागपुरी वड्यांच्या नादी लागला आणि पाशाची भाषाच बदलली.आत पोकळ,बाहेर पोकळ,डोंबाऱ्याचा वेळू…म्हातारपणी नवरा केला,तोही पोरं खेळू.आता फु बाई फु ….