खट्टा मिठा


——————-
भूवयांची फडफड
———————–
राजकीय रणनीतीकार म्हणून कुप्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ( तब्बल तीन तास ?) अनेकांच्या भुवया उंचावल्या.काहींच्या फडफडल्याही असतील.भुवई फडफडणं शुभंकर की अवलक्षण हे डावी की उजवी यावरून ठरतं म्हणतात.त्यामुळे या ऐतेहासिक (!) भेटीची वार्ता ऐकून कोण कोणाच्या उजव्या आणि कोण कोणाच्या डाव्या भुवया फडफडल्या ते पहावे लागेल.पण हे भ्रुकुटीसंकेत अनेकांच्या पोटात गोळा उठवणारे आहेत हे नक्की.कदाचित या केवळ हुलकावणीच्या भ्रूलीला देखील असू शकतात.द ग्रेट अनप्रेडिक्टेबल मॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शरद पवारांची ‘मन की बात’ कोणी जाणावी ? लोक काय तर्क-वितर्क लावायचे ते लावतील.अंदाज आणि अनुमाने बांधायला काय लागतं ? राईचा पर्वत खोदून खयाली पूल बांधायला गडकरींचा कशाला असायला हवं ? कल्पनांचे बोगदे बोडखी चंपाही खोदु शकते.ते असो पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ‘आता या पुढे हा धंदा बंद’ अशी प्रतिज्ञा घेतलेल्या प्रशांत किशोर यांनी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट कशासाठी घेतली असेल बुवा ? ती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी ? त्यातही पवार साहेबांनी आगामी निवडणूक शिवसेनेबरोबर अशी घोषणा केलेली असताना.बरे या भेटीत ( तब्बल तीन तास ? ) कोणी कोणाचे प्रबोधन केले असेल या बाबत शंकाच शंका आणि संभ्रमच संभ्रम आहेत.हे म्हणजे हत्तीने आपलं गंडस्थळ उंदराच्या टाळूशी मापून पहिल्या सारखं नाही का ? शिवाय इतका वेळ या दोघांनी चर्चा तरी काय आणि कशावर केली ? असं समजा की,शरद पवारांना २०२४ मध्ये महाराष्ट्रातून लोकसभेसाठी दोन आकडी खासदार आणि विधानसभेला तीन आकडी आमदार निवडून आणायचेत.तर हा चमत्कार खुद्द पवार साहेबच (मनावर घेतले तर) करू शकतात.पण ऊस ‘कांड्या’त कितीही वाढला पोसला तरी ‘वाढ्या’च्या (माढ्याच्या नव्हे..गैरसमज नसावा) पुढे वाढू शकत नाही हे पवारसाहेब तळहातावरच्या रेषांप्रमाणे जाणून आहेत.हे असे सगळे सूत्र समीकरण ठरलेले असताना अधिक-उणेच्या या गणितात प्रशांत किशोरचा ‘हातचा’ काय कामाचा ? त्याने काय प्लस-मायनस होणार ? पण पवार साहेब कधी कधी हूल देतात.खरी चाहूल  सांगू काय..हा कात्रजचा घाट आहे.म्हणजे दिशाभूल.पुण्यात शनिवारवाड्यात लपलेल्या शाहिस्तेखानाला हुसकावून पिटाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी छापा घातला होता.त्यावेळी झालेल्या झटापटीत शाहिस्तेखानाची बोटे वगैरे तुटली.नंतर मोगली सैन्याची दिशाभूल करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगाना मशाली बांधून त्यांना कात्रजच्या दिशेने पळवले आणि स्वतः वेगळ्याच (सध्याच्या सिंहगड रोड )मार्गाने गेले.याला म्हणतात कात्रजचा घाट दाखवणे.कळलं का प्रशांत किशोर भेटीचे कार्यकारण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *