पंढरीची वारी,निदान यंदा तरी ?


————————————
यंदाची आषाढी एकादशी मंगळवार दिनांक २० जुलै रोजी आहे.गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दक्षता म्हणून पंढरीची वारी रद्द करण्यात आली होती.देहू-आळंदी-पैठणसह सर्व संतांच्या मानाच्या पादुका विशेष बस मधून पंढरीला नेण्यात आल्या होत्या.याही वर्षी वारकऱ्यांनी पंढरीची वारी आपापल्या घरीच करावी असा सरकारचा प्रस्ताव आहे. वारकरी संप्रदाय मात्र पायी वारीसाठी आग्रही आहे.सर्वात लांब पल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मधून निघणारी संत मुक्ताबाईंची दिंडी येत्या १४ जून रोजी वाटचालीला निघावी असे संत मुक्ताई संस्थान पालखी सोहळा समितीचे नियोजन असून संत मुक्ताईच्या पादुका एसटी बस मधून नव्हे तर पारंपरिक पालखीत,पारंपरिक मार्गाने पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरीला जाव्यात अशी वारकऱ्यांची मागणी आहे.किमान १०० वारकऱ्यांना पालखी सोबत पायी  पंढरीला जाण्याची परवानगी द्यावी आणि हा निर्णय १४ जून पूर्वी घ्यावा असा राज्यातील सर्वच संत संस्थानांचा आग्रह आहे.आम्ही तुम्ही सांगाल ते नियम निकष अटी पाळू,पण यंदा तरी पंढरीची पायी वारी घडू द्या.विठोबाची धूळभेट घेऊद्या असे महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांचे सरकारला साकडे आहे.मानाच्या १० पालख्यांसह १५० नोंदणीकृत पालख्यांना पायी वारीची परवानगी द्यावी.अशी ही मागणी आहे.आम्ही सोशल डिस्टन्सचे नियम पाळू.सर्वजण लसीकरण करून घेऊ.शिवाय रोज टेस्टिंग करू.विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी,भोजन प्रसंगी किंवा उभे रिंगण,गोल रिंगण,मेंढी रिंगण,नीरा स्नान इत्यादी प्रसंगात गर्दी होणार नाही याची काळजी घेऊ.पंढरपुरातही शिस्तीत दर्शन घेऊ.परंतु निदान यावर्षीतरी पंढरीच्या पायी वारीला मोडता घालू नका,आमचा हिरमोड करू नका,अशी कळकळीची मागणी वारकरी संप्रदाय करीत आहे.वारकऱ्यांच्या या भावनेचा सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे .एकीकडे सरकार राज्यात जनजीवन,व्यवहार,दळणवळण पूर्वपदावर आणत आहे.अनेक ठिकाणी अनलॉक झाले आहे.बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.मॉल उघडलेत.सरकारी-खाजगी कार्यालये-आस्थापना-कारखाने-रेल्वे-बससेवा सुरु झाल्यात.राहिलेत फक्त शाळा कॉलेज विद्यापीठे आणि कोचिंग क्लासेस.कोरोना भरात असताना कुंभमेळा झाला.चार राज्यात निवडणुका झाल्या.सभा-रॅल्या झाल्या.एमपीएससी परीक्षा रद्द झाली तेव्हा  गोपीचंद पडळकर हजारो विद्यार्थ्यांना घेऊन पुण्यात भररस्त्यात लोळला.मराठा आरक्षणाच्या नावाने गोंधळ घालायला विनायक मेटेने बीडमध्ये मोर्चा काढला.हे सगळे चालते.मग कोरोना काय फक्त शाळा,दहावी-बारावीच्या परीक्षा आणि पंढरीच्या वारीतच घुसतो ? याचाही विचार सरकारने केला पाहिजे.निदान यंदा तरी पंढरीची पायीवारी झालीच पाहिजे.

रवींद्र तहकीक

7888030472

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *