देशद्रोहाचे टूलकिट


————————–
घर फिरले की घराचे वासेही फिरतात असे म्हणतात.पण ही म्हण अपभ्रंशित आहे,मुळातली म्हण ‘ग्रह फिरले की    तारेही फिरतात’ अशी आहे.केंद्रातील मोदी सरकारची,म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था आज घडीला नेमकी अशीच आहे.आजवर त्यांच्यावर मेहरबान असलेले ग्रह आता फिरले आहेत.त्यांची जागतिक आणि देशांतर्गत इमेज ढासळली आहे.’मोदी है तो कूच भी मुमकिन है’ हा आवाज आता क्षीण झाला आहे.भक्तगण हैराण गल्ली,परेशान रोडवर येरझारा घालताहेत.पक्षातही धुसफूस चालू झाली आहे.संघात तर चक्क मोदी हटावची कुजबुज ऐकायला मिळतेय.त्यातच पश्चिम बंगालचा पराभव,कोरोना कंट्रोल मध्ये आलेले घोर अपयश,आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था.या सगळ्या चक्रव्यूहात मोदींचा अभिमन्यू झाला आहे.परतीचा मार्ग माहित नसताना ते आत घुसत आणि फसत गेले.आता गळ्याशी आल्यावर ते नेहमीच्या पद्धतीने विरोधकांच्या देशद्रोहाचा कांगावा करीत आहेत.सर्वात प्रथम त्यांनी काँग्रेसवर टूलकिटचा आरोप केला.कायतर म्हणे देशाच्या बदनामीचे टूलकिट काँग्रेस वापरत आहे आणि ते त्यांनी भारत विरोधी विदेशी शक्ती कडून मिळवले आहे.कोण ही भारत विरोधी विदेशी शक्ती ? तर त्या बद्दल काहीच स्पष्टीकरण नाही.मोदी आणि मोदी सरकार विरोधात जो कोणी काही बोलेल तो विदेशी शक्तीचा हस्तक आणि देशद्रोही.मग त्या फेसबुक,व्हाट्स अप,ट्विटर,इंस्टाग्राम,कुहू किंवा अन्य इतर सोशल मीडियावरील कंपन्या असोत,इलेट्रॉनिक वाहिन्या असोत,प्रिंट मीडिया असो किंवा कोणी राजकीय विरोधक.ज्यांचा मोदींना विरोध ते देशद्रोही.मग तो कार्टूनिस्ट मंजुल असो की पत्रकार विनोद दुआ .किंवा शेतकरी आंदोलक टिकैत असो.हे सगळे देशद्रोही. काल काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींवर केलेल्या टिकेबद्दल माफी मागितली.का ? तर देशद्रोही ठरण्याची भीती.परंतु म्हणतात ना निखाऱ्याचा फुलण्याचा आणि विझण्याचा कालावधी निश्चित असतो.तसा मोदींचा विझण्याचा कालावधी सुरु झाला आहे.त्यांची लोकप्रियता आणि प्रभाव घटत चालला आहे.पक्षातही काहीतरी वेगळेच घाटत आहे.योगी आदित्यनाथ प्रकरणात संघ आणि भाजपने मोदींना त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.त्यातच सरकार आणि सरकारच्या धोरणावर टीका केली म्हणून सरकारने पत्रकार विनोद दुआ याच्यां विरोधात जो देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. तो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे.मोदींसाठी हा जोर का झटका आहे.तो यासाठी की मोदी आजवर अशा समजुतीत होते की पंतप्रधान कार्यालयासह अख्खे मंत्रिमंडळच नाही संपूर्ण देश माझ्या मर्जीने चालतो.त्यात राष्ट्रपती,न्यायालये,ईडी-सीबीआय,लष्कर,मीडिया,प्रशासन असे सगळे आले.म्हणजे मी सगळ्यांना गुंडाळले या भ्रमात मोदी कदाचित अजूनही आहेत.विनोद दुआ यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सरकार न्यायालयाने स्पष्ट म्हटले की,सरकार विरोधी मत, मतभेद व्यक्त करण्याच्या अभिव्यक्तीला देशद्रोह म्हटले जाऊ शकत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४  -ए मधील राजद्रोहच्या परिभाषानुसार, जर एखादी व्यक्ती सरकारविरोधी साहित्य लिहिते , बोलते किंवा असमाधान निर्माण करणार्‍या अशा साहित्याचे समर्थन करीत असेल तर ते देशद्रोह असून हा दंडनीय गुन्हा आहे.पण हा कायदा ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी तयार केला होता.आज देशात लोकशाही असताना तो तंतोतंत लागू होत नाही.आमची राज्यघटना प्रत्येक नागरिकाला आपले बोलणे व मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देते. अशा परिस्थितीत सरकार या कायद्याच्या दुरुपयोगही करु शकते.असे न्यायालयाने म्हटले आहे.हा मतितार्थ आता मोदींनी समजून घेतला पाहिजे.सरकारच्या धोरणांविरोधात असहमती व्यक्त करणे किंवा आवाज उठवणे हा राजद्रोह नाही तर लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.लोकशाहीने आणि घटनेने नागरिकांना सरकारच्या विरोधात मत मांडण्याचा,टीका करण्याचा,आंदोलन आणि चळवळी करण्याचा हक्क दिलेला आहे,हे काही देशद्रोहाचे टूलकिट नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.टूलकिट बिघाड दुरुस्त करण्यासाठी असते की बिघाड करण्यासाठी हेही पहिले पाहिजे असे सूचक वाक्य न्यायालयाने उद्गारले आहे.त्यातील सुजनवाक्य मोदींच्या कानी पडो आणि आणि त्यांच्या देशभक्ती आणि देशद्रोहाच्या व्याख्येत काही फरक पडो ही माफक अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *