आतला गोट :- खट्टा-मिठ्ठा


—————-
बातमी आतल्या गोटातली,म्हणजे खलबत खाण्यातली आहे.मातोश्रीवर झालेल्या बंद दाराआडच्या भेटीची रड कथा तुम्हाला माहीतच आहे.मंझले भाई अर्थात अमितभाई शहा आणि छोटा भाई अर्थात उद्धव ठाकरे यांच्यात ती गुप्त भेट झाली होती.त्यावेळी देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री असून) बाहेरच्या खोलीत शिववडे खात बसले होते म्हणे.तर त्या भेटीत म्हणे अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फिप्टी-फिफ्टीचा वायदा केला होता.हा अर्थात उद्धव ठाकरेंचा दावा.अमित शहांनी बंद दाराआडचं बाहेर सांगण्याची आमची संस्कृती नसल्याचं सांगत त्यावेळी युतीला आणि महाराष्ट्रातील सत्तेलाही कोळदांडा घातला.थोडक्यात फडणवीस काही ‘पुन्हा’ आले नाहीत.पण असो,पुढची सगळी कर्मकहाणी इथे सांगत नाही.तुम्हाला ती माहिती आहेच.कशाला उगाच काळे कोळसे उगाळायचे ? नाही का ! (पण हे त्या चंपाबाईला कोणी सांगावं.तिनं त्या रात्रीचा धोसराच काढलाय.)पुन्हा असो.तर आम्ही आज सांगतोय ती भन्नाट स्टोरी आहे दुसऱ्या बंद दारा आडच्या भेटीची.बडा भाय आणि छोटा भाय.किती दिवसांनी भेटताहेत हे त्यांनाही (दोघांनाही) आठवत नव्हतं.बाहेरच्या बैठकीत काय झालं हे सगळ्या चॅनल्स आणि न्यूज पेपर्सनी दळ दळ दळलंय.त्यामुळे ते पीठ आम्ही चिवडणार नाही.तशीही आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात काय मजा ? म्हणून आम्ही बंद दारा आडचं खास फुटेज मिळवलं.आता कसं ? असते.
कडेकोटालाही फट असते.तर आम्हाला (च) ज्ञात असलेल्या त्या फटीतून आम्ही मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या बंद दाराआडच्या भेटीचं फुटेज मिळवलं.आम्हाला वाटलं दोन भाऊ इतक्या दिवसांनी भेटलेत तर एकमेकांच्या गळ्यात पडून आणाभाका घेत असतील.एकमेकांना प्रेमाचे घास भरवत असतील.किंवा लाडेलाडे एकमेकांना टपल्या-ठोसे मारीत असतील.गालगुच्चे घेत असतील.पण कसचं काय अन कसचं काय.म्हणजे अर्थात फाटक्यात पाय.एकूण समग्र भेटीच्या ९० मिनिटांपैकी तब्बल ४० मिनिटे बंद दाराआड बैठक झाली.अजित दादा आणि अशोकराव चव्हाण बिचारे बाहेरच्या खोलीत बसलेले.आजूबाजूला माशाही नव्हत्या मारायला.पुन्हा सोशल डिस्टन्स,नाकावर मास्क.म्हणजे बोलायची पण चोरी.याचा अर्थ बंद दाराआड खूपच गप्पांचा फड रंगला होता असे नव्हे.आम्ही पहात होतो.उद्धव ठाकरे हातात कागदांची भली मोठी चळत घेऊन आपल्या नेहमीच्या रटाळ शैलीत कोरोना काळात केलेल्या कामाचा (मोदींच्या दृष्टीने पापाचा ) पाढा वंचित होते.प्रांजळपणे बोलतो,मनापासून सांगतो,किंबहुना हा माझ्या आत्म्याचा आतला आवाज समजा असे एकामागून एक कारकुनी माहितीचे एवढे मोठे चऱ्हाट त्यांनी वळायला घेतले की पेंगत पेंगत मोदी चक्क झोपी गेले.मराठा आरक्षणापासून पीक विम्यापर्यंत आणि अडकलेल्या जीएसटी पासून कोश्यारींनी दाबलेल्या बारा आमदारांच्या यादीपर्यंत छोटा भाईने बाहेरचंच दळण आत दळलं.नाही तरी होतंच काय दुसरं बोलण्यासारखं.कितीही ढुसण्या मारल्या तरी बैल पान्हावेल कसा ? बंद दाराआडचं एक्स्ल्युजिव्ह हे असं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *