जित्याची खोड

भाजपच्या प्रदेशाध्यक्षा ‘चंपा’बाईंना बहुतेक सध्या काहीच काम उरलेले दिसत नाही.म्हणून त्या सध्या रिकामपणाची कामगिरी म्हणून ‘त्या’रात्रीच्या शपथविधीवर संशोधन करीत आहेत.त्या रात्री काय घडले हे चंपाला सगळ्या महाराष्ट्रासोबतच म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर कळले.फडणवीसांनी त्यांना काही खबरच लागू दिली नाही.चंपाबाईंचे खरे दुखणे हेच आहे.म्हणजे रात्रीतून बाळ होतं,बाळसं धरतं,त्याचं बारसं होतं,घुगऱ्या वाटल्या जातात, तरी चंपाला ताकास तूर लागत नाही म्हणजे काय ? बाळ प्री-मॅच्युअर आणि कुपोषित होतं,म्हणून जगलं नाही,शिवाय ते अनैतिक देखील होतं हा भाग वेगळा.पण अगदी त्या सकाळ पासून आजतागायत चंपाचं पोट साफ झालेलं नाही.पोटात गुबारा धरलाय. ओकाऱ्या काढल्या.हवाबाण हरडे घेतल्या,पेट सफा खाल्ला,काढे पिले.कुंथुन झालं.पण छे ! करपट ढेकर,छातीत जळजळ आणि अपानवायू थांबायचे नाव घेईनात.(एनिमा तेवढा राहिलाय) ‘त्या रात्री नेमकं काय झालं,कसं झालं’ याचं नेमकं गूढ दोघांनाच माहित आहे.एक फडणवीस आणि दुसरे अजित दादा पवार.परवा चंपाच्या रोजच्या कुरकुरीला कंटाळून खुद्द फडणवीसांनी ‘त्या रात्री घडले ती गंभीर चूक होती’ हे मान्य केले.पण त्याचा पश्चाताप होतं नाही असेही सांगितले.त्यामुळे चंपाच्या पदरात माहिती ऐवजी निखाराच पडला.म्हणून त्यांनी तोंडाचा तोबरा करून,नाकाचा शेंडा मुरडत ‘पक्षाच्या ड्रॉवरमधून दादांनी त्या रात्री आमदारांच्या सह्यांचे पत्र कसे चोरले ? असा प्रश्न उपस्थित केला.हे पत्र भाजपाला देणे हे कोणत्या नैतिकतेच्या निकषात बसते ? अशी बोटेही मोडली.त्यावर संजय राऊतांनी चोरीचे पत्र देणे अनैतिक असेल तर ते स्वीकारणे,ते राज्यपालांना सादर करणे आणि त्या आधारे राष्ट्रपती राजवट उठवून शपथविधी घेणे हा तर राष्ट्रद्रोहाचा आणि घटनाभंगाचा गुन्हाच आहे.म्हणूनच     कदाचित  फडणवीस आणि अजितदादा त्या रात्रीबद्दल ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ म्हणून या विषयावर गेले दीड वर्ष गप्प आहेत.फडणवीस त्यावर योग्यवेळी पुस्तक लिहिणार असे म्हणतात तर दादा योग्य वेळी सांगेन म्हणतात.ही जी काही योग्य वेळ आहे ती येईपर्यंत खरेतर पक्षशिस्त म्हणून किंवा औचित्याचा भाग म्हणून चंपाने  तोंड बंद ठेवायला हवे.पण चंपाला पुन्हा पुन्हा उबळ येते,आणि मग ती विटून फेस झालेल्या शिळ्या कढीला ऊत आणते.ताकासाठी रामायण सांगते,आणि गाडगे मात्र लपवते.जित्याची खोड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *