महाराज की ‘मार’राज ?


बायकोला बेदम मारहाण करून ह.भ.प.चिकणकर बुवा फरार


आळंदीला गेल्याची वार्ता : पोलिसांनी केला गुन्हा दाखल


कल्याण /प्रतिनिधी
धाकट्या पत्नीच्या तक्रारीवरून थोरल्या पत्नीला बेदम मारहाण करणारा ह.भ.प.गजानन महाराज चिकणकर ‘बुवा’ फरार झाला असून कल्याण पोलिसांनी त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस त्यांच्या शोधात आहेत.ह,भ.प.गजानन महाराज चिकणकर बुवा यांचे कल्याण मधील मलंगगड जवळील द्वारली गावात स्वतःचे घर असून त्यांना दोन पत्नी आहेत.त्यांची पहिली पत्नी वृद्ध असून आजारी असते.स्वतः महाराज आळंदी-पंढरपूर असे वास्तव्याला असतात.गावोगाव जाऊन कीर्तने-प्रवचने करतात. .मात्र आषाढी आणि कार्तिकी वारीला पायी दिंडी देखील काढतात.हाच त्यांच्या उपजीविकेचा उद्योग आहे,मात्र गतवर्षीपासून कोरोनामुळे आषाढी-कार्तिकी यात्रा झाल्या नाहीत.दिंड्या-वाऱ्याही झाल्या नाहीत.तसेच बुवांची कीर्तने-प्रवचने देखील बंद आहेत.लॉक डाऊनमुळे पंढरपूर-आळंदीची मंदिरेही बंद असल्याने बुवांची कमाई गेल्या वर्षभरापासून बंदच आहे.अशा स्थितीत बुवा गेल्या वर्षभरापासून घरीच होते.त्यातच दोन बायकांमधील भांडण तंट्याला वैतागून बुवांनी जेष्ठ पत्नीला बेदम मारहाण केली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर स्थानिक शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुवांचे घर गाठून त्यांना समज दिली,तसेच पोलिसात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केला.त्याची दखल घेत पोलिसांनी बुवांचे घर गाठले.मात्र तोपर्यंत बुवा फरार झाले होते.बुवा आळंदीला गेले असल्याची वार्ता असल्याचे पोलिसांनी म्हटले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल असे म्हटले आहे.दरम्यान मारहाण झालेल्या पत्नीची आपल्या पती विरोधात तक्रार नसल्याची माहिती आहे .वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण असलेला हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.बुवा आपल्या वृद्ध  पत्नीला बादलीने तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करत असल्याचे दिसत आहे. महिला वारंवार मला मारु नका अशी विनंती करत असतानाही बुवा मात्र निर्दयपणे मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी घऱात इतर महिलाही काम करताना दिसत असून कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येताना दिसत नाही.महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली असून सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *