बीड जिल्हा पहिल्या मराठा क्रांती
संघर्ष मोर्चाने दणाणला

करोनातही मराठा समाज आक्रमक ;
बोलक्या मोर्चाने सरकारला घाम फोडला

बीड – महाविकास आघाडीतील इज्या, बिज्या , तिज्या सरकारने मराठा समाजाचा घात केल्याचा आरोप करत मराठा क्रांतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर निघालेल्या पहिल्या मोर्चाने शहर दणाणून गेले होते. करोना विषाणू संसर्ग आणि टाळेबंदीतही हजारोंच्या संख्येने सहभागी होत समाज बांधवांनी एक मराठा ,लाख मराठाची हाक देत राज्य सरकारला घाम फोडल्याचे चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळाले.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार दि.5 जून रोजी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात आला. सकाळपासूनच गावागावातून आंदोलक शहरात दाखल होत होते. सकाळी 11 वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून निघालेला मोर्चा संकुल रस्ता, सुभाष रस्ता , अण्णाभाऊ साठे चौक, बसस्थानक समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला. यावेळी आ.विनायक मेटे , नरेंद्र पाटील यांच्यासह क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हातात भगव्या पताका घेऊन सहभागी झालेले आंदोलक जय जिजाऊ – जय शिवराय , राज्य सरकारचे करायचे काय – खाली मुंडके वर पाय, आरक्षण आमच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा नगर रस्त्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आ. विनायक मेटे, नरेंद्र पाटील , रमेश पोकळे, मनोज जरांगे, राजेंद्र गात आदींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा, लाख मराठाची वज्रमुठ आळवत समाज बांधवांनी यापुढे आरक्षणाची लढाई अधिक तिव्र करण्याचा ईशारा राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींसह मराठा आरक्षणाचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची तरतूद करावी , नियुक्तीच्या प्रतीक्षेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले.


बीडच्या बोलक्या मोर्चाने
राज्याला दिशा दिली

बीड जिल्हा प्रशासनाने नाकारलेली परवानगी आणि करोना विषाणू संसर्ग अशा परिस्थितीत हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. याचा उल्लेख करतांना नरेंद्र पाटील यांनी बीडमधील पहिल्या मोर्चाने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. यापुढे राज्यात मूक नव्हे तर बोलकेच मोर्चे निघतील असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *