सभ्यता,नैतिकता,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याचे सगळे संकेत पायदळी तुडवणाऱ्या अर्णब गोस्वामी या बेलगाम पत्रकाराला महाराष्ट्र पोलिसांनी अखेर अटक केली आहे.खरे तर हा पिसाळलेला कुत्रा या पूर्वीच जेरबंद व्हायला हवा होता.त्याच्या अटकेवरून कुणाला काय गळे काढायचेत ते काढू द्या.पण रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या नावाखाली अर्णब जे काही करीत होता ते पत्रकारितेच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्याच निकषात बसत नव्हते.तो कोणत्या राजकीय पक्ष अथवा विचारधारेचा समर्थक आहे,हे लपून राहिलेले नाही.त्याच्या अटकेनंतर माध्यमात ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून त्याच्या राजकीय निष्ठा स्पष्ट झाल्या आहेत.त्याची अटक राजकीय कारणांनी आहे का ? असेलही.किंबहुना आहे असे मान्य करूया.पालघर मध्ये झालेले साधू हत्याकांड,सुशांत राजपूत आत्महत्या आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने अर्णब गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने ज्या पद्धतीचे कॅम्पेन चालवले त्यामुळे राज्यातले सत्ताधारी सरकार अर्णब गोस्वामीवर सूड उगवण्याची संधी शोधत होते.अर्णबची अटक त्याचाच परिपाक आहे असेही मान्य करता येईल.परंतु त्यामुळे अर्णब निर्दोष ठरत नाही.इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्याच्या आईने केलेल्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपातून  ही कारवाई करण्यात आली आहे.व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असलेल्या अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे कामाचे सुमारे ५ कोटी ४० लाख पैकी ८३ लाख रुपये थकवल्याने अन्वय नाईक निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांनीही आत्महत्या केली होती. अन्वय नाईक हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे.सुसाईड नोट मध्ये नाईक यांनी अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी आपण केलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटलेले आहे.अन्वय नाईकच्या पत्नी आणि मुलीने पत्रकार परिषद घेऊन या बाबतची वस्तुस्थिती सांगितली आहे.
   सुशांत राजपूत बाबतीत केवळ शंका संशयावरून सुतावरून स्वर्ग गाठत,कोणताही पुरावा नसताना ,सीबीआय किंवा पोलीस कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहचलेली नसताना, ती सुनियोजित हत्याच आहे असे गृहीत धरून,त्यात थेट आदित्य ठाकरेंचा हात आहे इथपर्यंत जाहीर आरोप करणाऱ्या,अर्णब गोस्वामीला जर नाईक आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट मध्ये नावाचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे अटक केली असेल तर त्यावरून एवढा गहजब करण्याचे कारणच काय ? अर्णब निर्दोष असेल आणि न्यायालयात ते सिद्ध झाले तर न्यायालय त्याची सुटका करेल.शेवटी इथे कायद्याचे राज्य आहे.आम्हाला आश्चर्य याचे वाटते की बिहारी सुशांत,हरियाणवी कंगना,भोपाळी अर्णबसाठी आक्रोश करणारे लोक अन्वय नाईक या मराठी तरुणाच्या मरणाबद्दल थोडीशीही सहानुभूती बाळगताना दिसत नाहीत.त्याच्या विधवा पत्नीबद्दल कणव दाखवत नाहीत हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल.अर्णब गोस्वामींचा कांगावा सुरूच आहे.तो पोलिसांना सहकार्य करायला तयार नाही.पोलीस त्याला ताब्यात घ्यायला पोहचले तेव्हा त्याने अटक करून घ्यायला नकार दिला.अखेर पोलिसांना त्याला फरफटत बाहेर काढावे लागले.यावेळी तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक परमवीरसिंह यांना अद्वातद्वा भाषेत बोलत होता.त्याची अटक म्हणजे जणू काही भारतीय स्वातंत्र्यावरचा घाला आहे असाच त्याचा अविर्भाव आहे.पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले तेव्हाही तो पत्रकाराच्या किंवा आरोपीच्या नाही तर एखाद्या क्रांतिकारकांच्या अविर्भावात गदारोळ माजवताना दिसला.त्याची क्रांती नेमकी कोणत्या दर्जाची हे ही आपण पत्रकारांनी तपासून पहायला हवे.आपल्याला आणि आपल्या पत्नी व मुलांना पोलिसांनी धक्काबुक्की केली.गाडीत पोलिसांनी मारहाण केली अशा उलट्या बोंबा तो मारतोय.पोलिसांनी असे काही केलेले नाही हे फुटेज मध्ये स्पष्ट दिसते आहे.हे ही राज्यातल्या नैतिकतेची चाड असणाऱ्या पत्रबंधूंनी उद्याच्या बातम्या करताना,त्यावर लेख-अग्रलेख लिहिताना पहिले पाहिजे.
       बाकी अर्णब गोस्वामी बद्दल आणि त्याच्या उर्मट,उद्धट,उद्दाम,एकांगी पत्रकारितेबद्दल काय बोलावे.त्याचा आक्रस्ताळेपणा,त्याच्या शिव्या,त्याचा टीआरपी घोटाळा,चर्चेसाठी बोलावलेल्या व्यक्तींवर त्याच्याकडून होणारी अरेरावी आणि दडपशाही हे सगळं झीट आणणारे असते.शहाणा माणूस अर्णबशी एक सेकंद देखील बोलू शकत नाही.मुंबईत राहून,मुंबईचेच अन्नपाणी खाऊन,अर्णब गोस्वामी आणि त्याच्या चॅनलचे पत्रकार मराठी पत्रकारांना चाय-बिस्कुटवाले म्हणून हिणवतात.त्याचा किती मराठी पत्रकारांनी निषेध केला ? नसेल तर का केला नाही ? अर्णब जे काही करतो ते पत्रकारितेच्या,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या,नैतिकता आणि सभ्यतेच्या निकषात बसत नाही असे आजवर कोणी मराठी पत्रकार जाहीरपणे बोललेला,त्याचा जाहीर निषेध केल्याचा निदान माझ्या तरी ऐकिवात नाही.तो जाहीरपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत उपमर्द करीत असताना आपण तोंडाला पट्टी लावून गप्प होतो.त्यामुळे आता त्या पिसाळलेल्या कुत्र्याला मुंबई पोलिसांनी पिंजऱ्यात जेरबंद केलेले असेल तर आपण पत्रकारांनी उगाच ‘प्रसार माध्यमांची गळचेपी झाली हो ‘ म्हणून गळे काढू नयेत.ज्यांना आणीबाणी आल्यासारखी वाटत असेल त्यांना वाटू द्यात.
-रवींद्र तहकिक
7888030472 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *