‘मराठ्याची पोर’ दुखवता कामा नये
सातारा /प्रतिनिधी
सोनी टीव्ही वरील मालिका ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर मालिकेच्या निर्मात्या, दिग्दर्शिका अलका कुबल तसेच याच मालिकेत चरित्र भूमिका साकारणारा अभिनेता शरद पोंक्षे आणि इतर जणांकडून होणाऱ्या सातत्याच्या मानहानी त्रासाला कंटाळून या मालिकेत ‘आर्या’ची भूमिका करणारी ‘मराठा’अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतरही शरद पोंक्षे आणि अलका कुबल यांनी प्राजक्ताच्या बदनामीची मोहीम चालवली होती.तिच्या कामाचे राहिलेले पैसे देण्यासही नकार दिला होता.या संदर्भात दैनिक लोकपत्रने गंभीर दखल घेत ‘काळूबाईचे कारस्थान’ नावाचा अग्रलेख लिहून आणि ‘येसूबाईंवर का कोपली काळूबाई’ हे वृत्त प्रकाशित करून प्राजक्ता गायकवाड हिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती.या अग्रलेख आणि वृत्ताची खासदार उदयन राजे भोसले छत्रपती यांनी दखल घेत माझी आई काळूबाईच्या निर्मात्या दिग्दर्शिका अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना सातारा येथे पाचारण करून त्यांच्यातील वाद मिटवला.इतकेच नाही तर प्राजक्ताला तिचे अडलेले मानधनही मिळवून दिले.मी ऑनलाईन वेबसाईटवर दैनिक लोकपत्रचे वृत्त आणि अग्रलेख वाचला.त्यातून प्राजक्तावर झालेल्या अन्यायाची माहिती मिळाली.एका मराठा कलावंत मुलीवर अशा प्रकारे कोणी जातीय द्वेषभावनेतून अन्याय करीत असेल तर ते आम्ही कसे सहन करणार.या पुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.असे उदयन राजे यांनी म्हटले आहे.मराठ्याची पोर दुखवता कामा नये अशा शब्दात उदयन राजे यांनी अलका कुबल यांना समज दिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेही दैनिक लोकपत्र मुळे आपणाला न्याय मिळाला असे सांगत लोकपत्रला धन्यवाद दिले आहेत.विशेष म्हणजे यामुळे प्राजक्ताचे माझी आई काळूबाई या मालिकेत पुन्हा पुनरागमन होणार आहे.स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या झी टीव्हीवर गाजलेल्या मालिकेत प्राजक्ता गायकवाड हिने येसूबाईंची भूमिका वठवली होती.

काळूबाई मालिकेतील एका सहकलाकाराने मराठा जातीवरून तसेच आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्राजक्ता गायकवाड हिने केला होता.या बाबत तिने मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्याकडे तक्रारही केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अभिनेता शरद पोंक्षे देखील सातत्याने आपल्याला एकटे पाडण्याचा तसेच जातीवरून हिणवण्याचा प्रयत्न करीत होते.कोरोनाकाळात आणि माझी इंजिनिअरिंग थर्ड इयरची परीक्षा असताना मला मुद्दाम आउटडोअर शूटिंग लावण्यात आले.मी सवड मागितल्यावर जमत नसेल तर मालिका सोड असे सांगण्यात आले. त्यामुळे मी मालिका सोडल्याचे प्राजक्ताचे म्हणणे होते. अलका कुबल यांनी तिचे आरोप फेटाळताना तिच्याबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या. ‘प्राजक्ता वेगवेगळी कारणे काढून सतत सुट्टी मागायची. सेटवर उशिरा यायची. तिच्या अनियमीततेमुळे अनेकदा चित्रीकरणाचा खोळंबा झाला होता,’ती अतिशय हेकेखोर आणि गर्विष्ठपणे वागायची असे आरोप अलका कुबल यांनी केले होते.मात्र, प्राजक्ताने हे सर्व आरोप फेटाळले होते.या लोकांनी जातीय कंपू बनवला होता.त्यांना माझी लोकप्रियता बघवत नव्हती.म्हणून त्यांनी मला पिटाळून लावले. ‘चार महिने केलेल्या कामाचे पैसे देखील दिले नाहीत असे प्राजक्ताने म्हटले होते.दैनिक लोकपत्र मध्ये या संदर्भातील वृत्त आणि अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर काही संघटनांनी अलका कुबल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा उल्लेख एकेरी केल्या मुळेही अलका कुबल ट्रोल झाल्या होत्या.त्याबद्दल त्यांनी नंतर माफीही मागितली होती.त्यातच आता उदयन राजे यांच्या मध्यस्थीने प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यातील वाद मिटल्याने प्राजक्ता पुन्हा काळूबाई मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसू शकणार आहे.