आरोपींचे पोलीस अधीक्षकांना पत्र
उ.प्र./वृत्तसंस्था
हाथरस बलात्कार व हत्याकांड प्रकरणात पीडितेवर बलात्कार झालाच नाही असा उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेला दावा आणि त्यावरून उठलेला गदारोळ विरत नाही तोच आता या प्रकरणातील आरोपींनी देखील आपण पीडितेवर बलात्कार केलाच नाही.तिचा मृत्यू कुटुंबीयांनीच केलेल्या मारहाणीमुळे झाला.आपण निर्दोष असून पीडितेच्या कुटुंबीयांनी आपणाला यात गोवले आहे असे पत्र पोलीस कोठडीतून पोलीस अधीक्षकांना लिहिले आहे.धक्कादायक बाब म्हणजे आरोपींचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.आरोपीनी पोलीस अधीक्षकांना पाठवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होत आहे.पोलिसांनी ज्या पद्धतीने पिडीतेचे पोस्टमार्टेम आणि अंत्यविधी गुपचूप उरकला.कुटुंबियांना मृतदेहाजवळ जाऊ दिले नाही त्यावरूनही उत्तरप्रदेश पोलिसांच्या हेतूबद्दल वाद निर्माण झाले आहेत.
  त्यातच आता बलात्कार प्रकरणी आपण निर्दोष असून आपल्याला यात अकारण गोवण्यात आले आहे, अशा आशयाचे पत्र या प्रकरणातील ४ आरोपींनी पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे. या आरोपींना सध्या ठेवण्यात आलेल्या अलीगड जिल्हा न्यायालयातून त्यांनी पाठवलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.आपली  पीडितेशी मैत्री होती. त्यामुळे या १९ वर्षांच्या दलित युवतीची आई व भाऊ यांनी तिला मारहाण केली आणि यात गंभीर जखमा होऊन ती मरण पावली, असेही मुख्य आरोपी संदीप याने या पत्रात म्हटले आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विनित जैस्वाल यांनी आरोपींकडून पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या पत्रावर कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.या प्रकरणातील संदीप, लवकुश, रवी व रामू ऊर्फ रामकुमार या ४ आरोपींची नावे व अंगठ्याचे ठसे पत्रात असून, मुख्य आरोपी संदीपच्या वतीने ते लिहिण्यात आले आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा करतानाच, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
  हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यापूर्वी राज्य सरकारने धमकी दिलेल्या पीडितांसमवेत काम करण्याचा अनुभव असल्याचे या स्वयंसेवी संस्थेने म्हटले असून हाथरस घटनेबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयास सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली आहे.
‘सिटिझन्स फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ या अर्जदार संस्थेने साक्षीदारांचे संरक्षण, मृतांचे हक्क, नार्को चाचणी, न्यायवैद्यक अहवाल आदी काही मुद्दे आपल्या अर्जात मांडले आहेत. काही ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या घृणास्पद कृत्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने त्यामध्ये प्रामुख्याने हस्तक्षेप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *