मा. मोहनजी भागवत,
आपले राष्ट्र एकजीव आणि प्रगत झाले पाहिजे याबद्दल कुठलाही वाद असण्याचे कारण नाही. पण आपण आपले हे राष्ट्र संविधानाच्या पायावर उभे आहे, हे वास्तव मुद्दाम बाजूला ठेवून चुकीची राष्ट्र कल्पना मांडता म्हणून हे आवाहन.आपण कायम हिंदुत्वाचा जप करत असता. असा जप करता करता “संविधाननिष्ठ भारतीयत्व”अप्रत्यक्षपणे नाकारत असता. कृपया आपण हिंदू या संकल्पने संदर्भात वर्तमानात अस्तित्वात असलेल्या रखरखत्या वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका.हिंदू म्हणून वावरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आणि पदोपदीच्या वर्तनात घाणेरडी जातीय उच्चनीचता असते. हा उच्चनीचतेचा भाव तथाकथित उच्च म्हणवल्या जाणाऱ्या जात समूहात मोठ्या प्रमाणात असतोच पण त्याचबरोबर  मधल्या आणि कनिष्ठ स्थानी ठेवलेल्या जात समूहातील माणसांच्या मनात देखील असतो. ही उच्चनीचतेची, भेदाभेदाची, अहंकाराची व तुच्छतेची घाण “हिंदू” धर्माने, त्याच्या वर्ण व जातिव्यवस्थेने प्रत्येकाच्या मनात घुसवलेली आहे. हा केवळ इतिहास नाही, तर भयंकर असे वर्तमान वास्तव देखील आहे. हे समाज जीवनातील भयंकर वास्तव कोणताही इमानदार माणूस नाकारू शकणार नाही. परस्परांशी व्यवहार करण्याच्या संदर्भात इथे “हिंदू” कोणीही नसतो. असतात त्या जाती. “फक्त हिंदू असणे” हे इथले मनोवास्तव नसून “जातिभेद” हे इथले प्रत्यक्ष जीवन व्यवहारातील मनोवास्तव आहे.असे असूनही आपण व आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या रखरखत्या वास्तवाकडे दुर्लक्ष करून हिंदुत्व या गोष्टीचा नेहमी जप करणारे लोक “संविधाननिष्ठ भारतीयत्व” रुजावे याचा आग्रह का धरत नाहीत? (ज्या संविधाननिष्ठ भारतीयत्वाचा पुरस्कार आधुनिक भारत या राष्ट्राच्या प्रगल्भ निर्मात्यांनी खूप मोठ्या विचारमंथनानंतर केलेला आहे.) ज्या संविधानाच्या पायावर आधुनिक भारत हे राष्ट्र उभे राहिलेले आहे, त्या संविधानाकडे दुर्लक्ष करून हिंदुराष्ट्राचा अजेंडा पुढे रेटणारे आपण लोक खरे राष्ट्रनिष्ठ असूच शकत नाहीत.आपणास हिंदू हे नाव घेऊन सर्वांवरील स्वतःचे वर्चस्व कायम टिकवायचे आहे, असे मी म्हटले तर ते चूक ठरणार नाही.संविधानापूर्वी आजच्यासारखा भारत अस्तित्वात नव्हता. आपापसात लढणारी अनेक राज्ये इथे अस्तित्वात होती. आपापल्या छोट्या-छोट्या राज्यालाच ते लोक आपला आपला देश मानत होते. ही राज्ये आपापसात कायम झगडत होती. युद्धही खेळत होती. इथे कुठलीही राष्ट्रीय एकजीवता नव्हती. आपले आजचे “सार्वभौम भारत” हे राष्ट्र बनवले आहे ते संविधानाने. विविधतेने नटलेल्या आणि फाटलेल्या लोकांना एक राष्ट्रीयत्वाच्या धाग्यात जोडले आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या भारतीय संविधानाने. मा.मोहनजी भागवत कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात आपण म्हणालात की हिंदुत्व हे जोडण्याचे काम करते. प्रत्यक्ष व्यवहारात तसे मुळीच आढळत नाही. अगदी आजही हिंदुत्व हे तोडण्याचे काम करते. आपण म्हणता की हिंदुत्व हे व्यापक आहे. आपले हे म्हणणे  पूर्णपणे असत्य आहे. आजचे प्रत्यक्ष सत्य हे आहे की, संविधान हे व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. संविधानाला फाटा देऊन आपलं हे जे चाललेलं आहे ते इमानदारीने आपल्या राष्ट्राची उभारणी करुन पाहणारं आहे असं मुळीच वाटत नाही.मोहनजी भागवत हे “हिंदू राष्ट्र” नाही, तर “आम्ही भारताच्या लोकांनी भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा संकल्प करून उभं केलेलं हे संविधाननिष्ठ राष्ट्र आहे. (भारतीय संविधानाची उद्देशिका आपण वाचली असेलच. ही उद्देशिका हाच आपल्या राष्ट्र निर्माणाचा पाया आहे हे कृपया जरा समजून घ्या.)आपण आपल्या संविधानावर अग्रक्रमाने आपली निष्ठा कधीच व्यक्त करत नाही.आपली निष्ठा असते ती हिंदुत्वावर आणि जुन्या हिंदू परंपरांवर. जुन्या परंपरांमध्ये असलेल्या माणसाला माणसावर प्रेम करावयास लावणाऱ्या व कृषी संस्कृतीशी संबंधित गोष्टींबद्दल माझा काहीही आक्षेप नाही. पण या परंपरेत अनेक अंधश्रद्धा आणि भेदाभेद आहेत. या परंपरा आणि भेदाभेदांवर आपण अग्रक्रमाने कधीच टीका करत नाहीत, तर परंपरांचा गौरव करता, पुरस्कार करता.किमान सर्व हिंदू तरी एकजीव व्हावेत असे आपणास इमानदारीने वाटत असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच अग्रक्रमाने  “हिंदूंमधील जातिव्यवस्थेचा अंत” करण्याचा मुद्दा  केंद्रस्थानी ठेवला असता; आणि त्या दिशेने काम केले असते. पण जातीय भेदाभेद आणि उच्च-नीचतेबद्दल तेव्हाही आपली संघटना बोलली नाही आणि आजही आपण बोलत नाहीत. जातिव्यवस्था कायम टिकवून आपण हिंदूंचं कसलं हित साधणार आहात?
      मा.मोहनजी भागवत आपणास माझं विनम्र आवाहन आहे,की राष्ट्रवाद, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र एकजीव होणे,राष्ट्र बलाढ्य होणे,राष्ट्राची प्रगती होणे हे आवश्यकच आहे. ते सर्व भारतीय लोकांना मिळून करावंच लागणार आहे.पण आपण हे लक्षात घ्या की इथली जातिव्यवस्था आणि इथल्या परंपरेत असलेल्या अनेकविध अंधश्रद्धा कायम ठेवून हे राष्ट्र कधीही एकजीव होऊ शकत नाही आणि प्रगतीही करू शकत नाही. आपणाला इमानदारीने हे राष्ट्र एकजीव व्हावे आणि त्याने सर्वांगीण प्रगती करावी असे वाटत असेल, तर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इथून पुढचा एक नंबरचा कार्यक्रम “जातिअंताचा” ठेवा. “अंधश्रद्धांच्या अंताचा” ठेवा. त्यासाठी इथल्या कनिष्ठ जात समूहातील लोकांना सबल करण्याचे, हिंदूंचे खास वैशिष्ट्य असलेली बेटीबंदीची चाल उखडून काढण्याचे, आंतरजातीय विवाहाचे, बुद्धिवाद आणि विज्ञानवाद रुजवण्याचे कार्यक्रम संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात राबवा. असे आपण केले तरच आपला राष्ट्रवाद खरा आहे, असे म्हणता येईल. आजवर आपल्या संघटनेने असे काहीही केलेले दिसत नाही. इथून पुढे या दिशेने काही प्रबोधनात्मक व कृतिशील पावले आपण टाकत असाल तर त्या पावलांचे माझ्यासारखा संविधाननिष्ठ राष्ट्रवादी माणूस स्वागतच करेल.

आपला राष्ट्रबांधव
प्रा. डॉ. अनंत राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *