माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा
मराठा आरक्षणासाठी घुमणार एल्गार  


मुंबई /प्रतिनिधी
साताऱ्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उदयन राजे विरुद्ध निवडणूक लढवलेल्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी एल्गार पुकारण्याची उद्घोषणा केली असून या प्रसंगी भाजपचे खासदार उदयन राजे आणि संभाजी राजे हे दोघेही जातीने हजर राहणार आहेत.नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते असण्याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचेही अध्यक्ष आहेत.आज (७ ऑक्टोबर ) सकाळी ११ वाजता मुंबईतील माथाडी कामगार भवनात कोल्हापूर आणि सातारा गादीच्या दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना एकत्र जमणार आहोत. मराठ्यांचा राज्यातील नोकऱ्यांचा १६ टक्के आरक्षणाचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही  महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांच्या विविध बैठक विविध ठिकाणी झाल्या आहेत.काही ठिकाणी होत आहेत,किंवा होत राहतील.त्याबद्दल आक्षेप काही नाही,पण त्यामुळेच मराठा समाज विखुरलेला असल्याचे चित्र निर्माण होते.काही लोक वयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे डावपेच करीत आहेत असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
   एक बैठक छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये झाली. कोल्हापूरमध्येही आमच्या भाऊबंधांनी बैठक घेतली. पुण्यात आमदार विनायक मेटेंनी बैठक घेतली.१९८० साली माझ्या वडिलांनी (अण्णासाहेब पाटील )मराठा महासंघ स्थापून आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळी पासून मराठा  माथाडी कामगार आणि महाराष्ट्रातील मराठा शेतकरी आरक्षणापासून वंचित आहे.दरम्यान आरक्षणाचे फक्त राजकारणच झाले.पण आता तसे होऊ देणार नाही असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला काही तरी करता येईल.जेणेकरून केंद्र आणि राज्य सरकार आमच्या बाबतीत योग्य निर्णय घेईल.न्यायालय सकारात्मक विचार करेल.आमच्या आरक्षणाला स्थगिती मागण्याची किंवा विरोध करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.


      राज्यात येत्या १० ऑक्टोबरला एमपीएससीच्या परीक्षा होत आहेत.मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने त्यात मराठा मुलांचे नुकसान होणार आहे.फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ही फसवणूक होती हे आता लक्षात आले आहे.त्यांनी आपल्याला आपसात झुंजवले.अजूनही त्यांचे हस्तक त्यांचे काम करत आहेत.मराठ्यांत दुही पेरण्याचे काम सुरु आहे.आपल्यातलेच काही स्वार्थी फंद फितूर त्यांच्या षड्यंत्रात सामील आहेत.त्यांना वेळीच बाजूला सारले पाहिजे असेही नरेंद्र पाटील यांनी यावेळी म्हटले.दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ,असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *