नवी दिल्ली /वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाशी संबंधित विषय तीन सदस्यीय घटनापीठाच्या विचाराधीन असताना दरम्यान सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्पुरती उठवण्यात यावी या राज्यसरकार आणि मराठा आरक्षण समर्थकांच्या विनंती अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती नागेश्वरराव यांच्या न्यायपीठाने आज चार आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी दिवाळीनंतरच होणार असल्याने मराठा आरक्षणाचा विषय तूर्तास तरी ‘दिवाळ’खोरीत निघाल्यात जमा आहे.
    सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा विषय घटनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय घटनापीठाकडे सोपवला आहे.या बाबतचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारने (मागील फडणवीस सरकार) एसईबीसी प्रवर्गाअंतर्गत दिलेल्या १२ टक्के आरक्षणाला स्थगिती दिली.त्यामुळे राज्यातील ११ वीचे प्रवेश आणि एमपीएससी परीक्षा तसेच सरकारी नोकरभरती देखील खोळंबली आहे.या समस्येचे सुचालन व्हावे या साठी मराठा आरक्षण समर्थक विनोद पाटील आणि राज्य सरकारच्या वतीने न्यायमूर्ती नागेश्वरराव यांच्या न्यायपीठासमोर घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्पुरती उठवण्यात यावी यासाठी विनंती अर्ज करण्यात आले होते.या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी झाली.न्यायालयाने दिलेल्या वेळेत सकाळी राज्यसरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता मुकुल रोहितगी उपस्थित राहू शकले नाहीत.त्यानंतर दुपारी पुन्हा ही सुनावणी झाली.यावेळी रोहितगी उपस्थित होते.मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील आणि राज्यसरकारचे वकिलांची बाजू ऐकून न घेताच सुनावणी चार आठवड्यासाठी पुढे ढकलली.आता ही सुनावणी जवळपास एका महिन्यानंतर,२६ नोव्हेंबरला होणार आहे.मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे राज्यसरकार आता ११ वी प्रवेश,एमपीएससी परीक्षा,आणि नोकरभरती संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.न्यायालयाने सुनावणी लांबवल्या मुळे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या संघटना आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून विरोधीपक्षांच्या हातातही या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले आहे.मराठा समाजही या निर्णयामुळे अस्वस्थ होणार आहे.———————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *