* मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मिळताच भारतीय जनता पक्ष आक्रमक झालेला दिसत आहे.काही मराठा संघटनांना हाताशी धरून स्थगितीचे सगळे खापर महाविकास आघाडी सरकारच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न होत आहे.दुसरीकडे काही मराठा संघटना स्वतंत्रपणे आंदोलने,बैठका,परिषदा वगैरे घेत आहेत.या बाबत काय सांगाल ?
– मी कालच म्हणालो की आजवर दोन राज्यसरकारांनी दोनवेळा मराठा आरक्षण दिले आणि दोनवेळा त्याला स्थगिती मिळाली.समजा तुम्ही आंदोलने केली आणि राज्य सरकारने पुन्हा अधिसूचना काढली तर काय होईल.पुन्हा कोणीतरी सोम्या-गोम्या त्या विरोधात याचिका टाकेल आणि सुप्रीम कोर्ट पुन्हा स्थगिती देईल,हा खेळ कुठवर चालायचा ? प्रकरण घटनापीठाकडे गेले आहे,म्हणजे काय ? घटनापीठ घटनेतील तरतुदी आणि न्यायालयाच्या निर्णयाची पडताळणी करणार.त्यातून निष्कर्ष काय निघणार हे सांगायला एखाद्या भविष्यवेत्त्याची किंवा कोणा कायदेतज्ज्ञाची आवश्यकता नाही.

* म्हणजे थोडक्यात इकडे आड तिकडे विहीर आहे असे म्हणानात.
– स्वतःहून आड आणि विहिरीच्या मध्ये जाऊन उभे राहायचे आणि पुन्हा इकडे आड तिकडे विहीर म्हणायचे याला काय अर्थ.सरळ रस्ता आहे तो सोडून भलत्याच रस्त्याने फिरताय.बुडत्याचे पाय डोहाकडे.
* सरळ रस्ता कोणता ?
-अर्थात मराठ्यांसाठी संसदेत विशेष आरक्षण आणि शैक्षणिक सवलतींचे विधेयक पास करणे.ज्याचा फायदा मराठ्यांना देश आणि राज्यपातळीवरील सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात होईल.कोणाच्या अध्यात नको कोणाच्या मध्यात नको.मराठा आरक्षणाला कोणत्याच पक्षाचा विरोध नाही ना ? मग आमच्या राज्यातून लोकसभेत आणि राज्यसभेत गेलेल्या सगळ्या खासदारांना हा विषय संसदेत लावून धरायला सांगा.त्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा निवडून यायचे आहे.मराठा समाजाची मते हवी आहेत.सर्व मराठा संघटनांनी महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना हा विषय संसदेत मांडण्यासाठी भाग पाडले पाहिजे.पाणी तिकडे आहे,इकडे कुठे तोट्या फिरवताय.इथे बोंबलून काही होणार नाही.आडात नाही पोहऱ्यात कोठून येणार ? मीच नाही न्यायमूर्ती पी.बी.सावंत देखील हेच सांगत होते.अगदी पहिल्या एक दोन मराठा मोर्चा नंतर लगेच त्यांनी हा विषय राज्यात नाही दिल्लीत न्या असा सल्ला दिला होता.पण काही लोकांना इथेच आट्यापाट्या खेळण्यात इंटरेस्ट होता,त्यांना सावंतांचा सल्ला मानवला नाही.आजही मी ओरडून हेच सांगतोय.मराठा आरक्षण दिल्लीतून आणा.म्हणजे अबाधित राहील.पण कोणी ऐकायला तयार नाही.काही समजून उमजून वेड पांघरताहेत.काहींना काही कळतच नाही असे वाटतंय,तर काहींना यातून फक्त राजकारण साधायचे आहे.काही पोटभरू-कमाईवाले देखील आहेत.म्हणजे तसं माझ्या कानावर आलंय.मराठा आरक्षण आंदोलनातले हे सगळे नासके कांदे निपटून बाहेर फेकले पाहिजेत.
* मराठा संघटनात एकी नाही म्हणून आंदोलन विस्कळीत झाले.त्याचा फायदा सगळे राजकीय पक्ष घेतात असे म्हटले जाते.
– तुम्ही काय बोळ्याने दूध पिता का ? मराठा संघटनात केव्हा एकी होती,आहे आणि भविष्यात निर्माण होणार आहे.मला नाही वाटत.कोपर्डीच्या घटनेनंतर सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चा नावाची चळवळ उभी केली.राज्यभर मोर्चे काढले.त्याला ग्रामीण शहरी सगळ्याच मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हा एक चमत्कार होता.मराठा समाज उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता.मराठा संघटनांना वाटले ही गर्दी आपल्याच मुळे जमली.त्यात मग तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आंदोलक संघटनात फूट पाडली.फंद फितुरी माजवली.अनेक जण भाजपच्या आमिषांना बळी पडले.भाजपच्या कच्छपी लागले.काही अजूनही त्यांच्याच कळपात आहेत.भाजपने एका हाताने मराठा आरक्षण दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले.आता पुन्हा त्यांच्या लाभार्थी हस्तकांकरवी मराठा समाजाला चेतवायचा फितवायचा प्रयत्न चालू आहे.मराठा आंदोलनात काही नासके कांदे आहेत जे आपल्या आसपासच्यांनाही बाधित करीत आहेत.हे नासके कांदे निपटून बाजूला फेकले पाहिजेत.
* कोणी करायचे हे काम ?
-झालेय जवळपास.मराठा समाज एवढाही दुधखुळा नाही.काही मराठा संघटना आणि त्यातील आंदोलकांनी केलेली लबाडी,कुलंगडी समाजाने ओळखली आहे.भाजपने काय करामत केली हेही मराठा समाजाला समजले आहे.म्हणूनच मराठा समाज आता कोणालाही प्रतिसाद देताना दिसत नाही.नुसत्याच बैठका आणि परिषदा होताहेत.गोंधळ जागरणं होताहेत.फक्त मान्यवर नेते,संघटनांचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते.यात समाज कोठे आहे.का नाही ? समाज आपले काम करीत आहे.
कोण असली कोण नकली,आणि आपले गाडे कुठे अडकलेय.हे समाजाला कळून चुकले आहे.
* या परिस्थितीला तोडगा काय ?
– सरळ साधा उपाय मी सांगितला.इथे आदळआपट करण्यापेक्षा खासदारांना संसदेत बोलायला सांगा.केंद्र सरकार काय भूमिका घेते ते पहा.आणि गरज भासल्यास आंदोलन करा.पण हे आंदोलन संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे झाले पाहिजे.त्या आंदोलनात सत्ताधारी काँग्रेससह कम्युनिष्ट,समाजवादी,दलित,हिंदुत्ववादी असे सगळेच सामील झाले होते.सर्वसामान्य जनता.अगदी सरकारी नोकरदार,गिरणी आणि गोदी कामगार,मुंबईतला चाकरमानी,अवघा मराठी माणूस या लढ्यात उतरला होता.इतके प्रखर एकीचे आंदोलन झाले आणि खासदारांनी दिल्लीत दबाव आणला तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे वेळी जसे तत्कालीन नेहरू सरकार महाराष्ट्रापुढे झुकले तसेच आता मोदी सरकारही झुकेल.आणि मराठा समाजाला निर्विवाद निर्धोक आरक्षण मिळेल.जे केंद्र आणि राज्यातही लागू असेल.माझ्या दृष्टीने या मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सध्यस्थितीत हाच उत्तम तोडगा आहे.एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही.लाकूड तासून घ्यावे लागेल.पाचर ठोकून बसवावे लागेल.
* आपल्या या मुलाखतीतून काही प्रश्नांचा उलगडा झाला.काही संदेश संकेत मिळाले.ते मराठा समाज आणि संघटनांना कितपत पटतात,पचतात,मान्य होतात हेही महत्वाचे आहे.विषय अनेक आहेत.आरक्षण आणि त्यातील अडसर गुंत्यांचा मुख्य विषय आहेच.सोबत शैक्षणिक सवलती,आणि इतर मागण्याबाबतचेही अनेक विषय आहेत.मुलाखतींची मालिका सुरु केली आहे.त्यातून या विषयाची सांगोपांग चर्चा व्हावी.काय घडले,काय घडतंय,या बाबत मराठा समाज सजग व्हावा.या हेतूने या मुलाखती आहेत.आपण त्यासाठी वेळ दिलात त्या बद्दल धन्यवाद.आभार.
-धन्यवाद.नमस्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *