लोकपत्र /विशेष
मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ दौरे केले मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारीची चालढकल करण्यापलीकडे दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांना कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही.मरणारे मेले,मढी उचलायची कोणी यावरून खांदेकऱ्यांत भांडणे अशीच एकूण परिस्थिती आहे .त्यामुळे या वांझोट्या दौऱ्यांचे फलित काय.आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला आला होतात की त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला असा संतप्त सवाल शेतकरी विचारात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर-उस्मानाबाद दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार योग्य ती मदत करील.या बाबतच्या सूचना मी सरकारला देईल,मात्र या संकट प्रसंगी केंद्रानेही मदतीचा हात दिला पाहिजे.त्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान मोदींची भेट घेऊन पाठपुरावा करू असे पवार यांनी म्हटले होते.त्या नंतर झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात केंद्र आणि राज्याकडून शेतकऱ्यांना काही दिलासादायक घोषणेची अपेक्षा होती.मात्र या बाबतीत दोघांचेही दौरे वांझोटे ठरले.मदत देण्याची जबाबदारी केंद्राची की राज्याची यावरच अधिक खल झाला.केंद्राला मदत मागितली म्हणून काय झाले,केंद्राचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही का,मोदी भारताचेच पंतप्रधान आहेत ना की पाकिस्तानचे आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले तर उठ सुठ केंद्राकडे हाथ पसरता..तुमच्यात दम नाही का ? काय थिल्लरपणा लावलाय असे फडणवीस यांनी उत्तर दिले.माळ्याची मका आणि कोल्ह्यांची भांडणं असाच हा प्रकार झाला.बैल गाभण…नववा महिना ! शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही.