भाग : एक 
———————————-राणे समितीच्या अहवालावरून आघाडी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर ते आरक्षण तकलादू होते असे सांगत फडणवीस सरकारने गायकवाड समितीच्या शिफारशीवरून पुन्हा नव्याने अधिसूचना काढून मराठा आरक्षण दिले.आमचे आरक्षण शंभर टक्के टिकावू असल्याचा दावा केला गेला.त्याविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टात वकिलांची फौज उभी करण्याच्या वल्गना झाल्या.मात्र अखेर सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या मराठा आरक्षणालाही स्थगिती दिली.ही स्थगिती अंतरिम नाही.प्रकरण आता त्रिसदस्यीय घटनापीठाच्या विचाराधीन आहे.आपण पुन्हा अर्ज विनंत्या पुनर्विचार याचिका दाखल करू.वगैरे चर्चा चालू आहेत.आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांना जबाबदार धरण्याचे राजकीय प्रयोग देखील जोरात सुरु आहे.या निमित्ताने जो तो आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.मराठा संघटनांना या निमित्ताने पुन्हा एकदा कामधंदा मिळाला आहे.भाजप या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा,मराठा समाजाला सरकार विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे.या कामी राणे-मेटे अपयशी ठरल्या नंतर त्यासाठी त्यांनी आता छत्रपतींच्या कोल्हापूर गादीचे वारस आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज भाजप खासदार संभाजी भोसले यांना पुढे केले आहे.ते चक्क लोकशाहीत तलवारी चालवण्याची भाषा करीत आहेत.आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या.नाहीतर ओबीसीत घ्या.आम्हाला नसेल मिळणार तर कोणालाच आरक्षण नको अशी टोकाची ( खरे तर संघाच्या अजेंड्यातील सामान नागरी कायद्याची) भूमिका घेत आहेत.त्यांचे हे रेशीम बागेतील बौद्धिक ऐकून प्रकाश आंबेडकर यांच्या सारखे बुद्धिवंत नेतेही बिनडोकपणाची भाषा करताना दिसत आहेत.वातावरण पेटत आहे.ते कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही.मराठा आरक्षणाचा आग्रह धरणाऱ्या मराठा संघटनातही ऐक्य आणि एकमत नाही.काही पोहचलेले तर काही पाचपोच नसलेले.काही अगदीच चिंधीचोर तर काही निव्वळ पोटभरू.अशी सगळी गर्दी गम्मत मराठा संघटनात माजली आहे.कोणाचाच पायपोस कोणात उरलेला नाही.अशी एकंदर दुरावस्था आहे.अशा परिस्थितीत मराठा समाजाने करायचे तरी काय ? विशेषतः तरुणांनी.ज्यांचे आयुष्यच आरक्षणाच्या विषयाने पणाला आणि टांगणीला लागले आहे.परीक्षा स्थगित करून,नोकर भरती रोखून,प्रवेश प्रक्रिया खोळंबवून पदरात काय पडणार आहे ? राहिला नाही भरवसा पावसाचा,आसवांवरी आता पिकांची भिस्त आहे.अशीच एकूण परिस्थिती आहे.पण पाऊस नाही म्हणून त्याची वाट पहात मशागत थांबवायची का ? घाम गाळून शेत पिकवणाऱ्या मराठ्यांनी असे आयते जांभूळ तोंडात पडण्याची वाट पहात ,दे रे हरी खाटल्यावरी असे म्हणत हातपाय गाळून कसे भागेल.
विषय गंभीर आहे.त्याची तेवढ्याच गांभीर्याने आणि व्यापक चर्चा व्हायला हवी.मराठा समाजातल्या शहाण्यासुरत्या जेष्ठांचे या बाबतीत काय मत आहे.त्यांचे अनुभवाचे बोल काय सांगतात.नव्या पिढीच्या तरुणाईला ते कोणते हिताचे सल्ले देऊ इच्छितात.याचा उहापोह दैनिक लोकपत्र घेत आहे.या उद्बोधक मॅरेथॉन मुलाखत मालिकेतील आजची ही पहिली मुलाखत.माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील.
================


* नमस्कार सर.फारसे आगत-स्वागताचे सोपस्कार न करता आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूयात.
-होय,ही सोपस्कार पाळण्याची वेळही नाही.कसले आगत-स्वागत.आपल्याकडे म्हणतात ना,मढे झाकून पेरणी करावी लागते.तसाच हा अटीतटीचा बाका प्रसंग आहे.सभोताली किर्र दाट अंधार,काट्याकुट्यांची
 निसरडी वाट.भोवताली हिंस्र श्वापदांचा संचार.आणि फसवे चकवे.यातून मराठा समाज जीव मुठीत धरून वाट काढतो आहे.
* पण वाट सापडेल का.या काळरात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल, दडलेला का होईना पण निदान शक्यतेत तरी आहे का ? 
-का नाही.का नसावा.गेली हजारो वर्ष मराठा समाजाने या भूमीवर घाम गाळला आहे.रक्त सांडले आहे.तथाकथित उच्चवर्णीयापासून ते अठरापगड जाती जमातीतले बहुजन,दलित-मागासवर्गीय,भटके -विमुक्त या सर्वांना दूध-दुभते,अन्नधान्य,तेल-गूळ पुरवणारा पोशिंदा आणि संकट प्रसंगी रक्त सांडून सगळ्यांचे रक्षण करणारा मराठा समाज.आज विपन्नावस्थेत आहे.जो कधी काळी खाऊन पिऊन सुखी संपन्न होता.गावात पंचक्रोशीत त्यांचा आब-रुबाब होता.गावात दाबही.त्यात काही पाटील,काही देशमुख ,काही सरदारही होते.काही काळ हा समाज राजकर्ताही होता.आजही राजकारणात मराठ्यांची कमी नाही.मराठ्यांची काही घराणी आजही तालेवार आहेत.काही बागाईतदार आहेत.काही सहकार महर्षी,काही शिक्षण सम्राट आहेत.काही सरकारी-खासगी नोकऱ्यांत.काही उद्योग व्यापारातही आहेत.परंतु या संपन्न मराठ्यांची संख्या एकूण मराठ्यांच्या संख्येत नगण्य म्हणजे १० ते १२ टक्के सुद्धा नाही.त्यात ज्यांनी कधीकाळी कुणबी बनण्याचा सुजाणपणा केला ते आज ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत.पण जे निव्वळ मराठे राहिले.विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात.त्यांचे आज बेहाल आहेत.त्यातही पश्चिम महाराष्ट्रातल्या बागाईतदार पट्ट्याला अजूनतरी चिंता नाही.पण मराठवाडा,नगर-नाशिक आणि सोलापूरचा काही भाग.जळगाव-धुळे इकडील ओबीसी नसलेल्या मराठ्यांना नोकऱ्यांत आरक्षण आणि शिक्षणात सवलतींची नितांत गरज आहे.हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर काहीही होऊ शकते.म्हणजे असंतोषाचा उद्रेक होऊन अराजक माजू शकते किंवा निराशेत आत्महत्यांचे सत्र सुरु होऊ शकते.पोटात भूक आणि हाताला काम नसलेले मराठे गुन्हेगारीकडेही वळू शकतात.याचा समग्र सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार राजकर्त्यांनी करायला हवा.

* आपण म्हणता ते शंभर टक्के बरोबर आहे.परंतु राजकर्ते तर नेहमीच आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत असे म्हणतात.मग ते सत्ताधारी असोत की विरोधी असोत.म्हणजे असे बघा की काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी,भाजप,इतकेच काय वंचित बहुजन,आरपीआय,मनसे,एमआयएम किंवा आणखीही जे कोणी राजकीय पक्ष असतील,विविध सामाजिक संघटना असतील सगळेच जण आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे.असे म्हणतात.पण आरक्षण मराठ्यांच्या पदरात मात्र पडत नाही.

-इथेच तर खरी मेख आहे,संपादक महोदय.तुम्ही त्यातला गाभा लक्षात घ्या.सगळ्या राजकीय पक्षांना मराठा समाजाची मते हवी आहेत.त्यामुळे सगळेच आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगतात.यातल्या कितीजणांच्या मनात खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळण्याची आस आस्था इच्छा आहे आणि किती जणांच्या मनात असूया दडलेली आहे हे हळू हळू समाजाच्या लक्षात येतंय.सर्वांचे खरे चेहरे आता उघडे पडतील.तो दिवस दूर नाही.

* म्हणजे कोणत्याच राजकीय पक्षाला मराठा आरक्षणाबाबत मनापासून काळजी नाही ?
– आहे ना.मराठा आरक्षणाची काळजी आहे.पण ती मराठ्यांच्या फायद्यासाठी नाही.तर स्वतःच्या राजकीय मतलबासाठी.आघाडी आणि भाजप दोघांनी वेगवेगळे एक-एकदा मराठा आरक्षण दिले.दोन्ही वेळा फेल गेले.का म्हणून विचारा ? राज्य सरकारला आरक्षणाची ५० टाक्यांची मर्यादा ओलांडतातच येत नाही.उगीच आपले मग इथेच ५२ टक्के कसे.तामिळनाडूत ६९ टक्के कसे.मराठे हे कुणबीच कसे यावरून खल घालायचा.निष्पन्न काय ? तर तेलही गेले आणि तूपही गेले,हाती उरले धुपाटणे.दरम्यान तिकडे केंद्रात मोदी सरकारने संसदेत कायदा पास करून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिक दृष्ट्या दुर्बल सवर्णांना राष्ट्रीय पातळीवरचे १० टक्के आरक्षण देऊनही टाकले.आपण बसलो पत्रावळी धूत.तिकडे ते जेऊन ढेकर देऊन पसार.मी म्हणतो भाजपला एवढीच काळजी चिंता आस्था आहे मराठ्यांची,तर मोदींना सांगून संसदेत कायदा टाका ना पास करून.पण ते नाही,त्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे आहे.त्यासाठी मग राजेंना पुढे करून मराठा संघटनांना चिथावण्याचे आंदोलन चेतवण्याचे उद्योग सुरु आहेत.नाही ते मुद्दे उकरून काढले जात आहेत.

* तुम्हाला ओबीसी मुद्द्याबद्दल म्हणायचे आहे
-नाहीतर काय.आता जे मराठे कुणबी म्हणून ओबीसीत आहेत ते आहेत.पण उर्वरित मराठ्यांना ओबीसीत टाकणे आता तांत्रिक आणि सांख्यिक दृष्ट्या शक्य नाही.तिथे आधीच गर्दी आणि चेंगराचेंगरी आहे,त्या कल्लोळात जाऊन काय करणार.त्यापेक्षा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणेच किफायतशीर आहे.दुसरा मुद्दा आम्हाला नाही तर कोणालाच नको.तलवारी उपसाव्या लागतील वगैरे.ज्यांच्या पूर्वजांना मराठे आपले दैवत मानतात त्यांनी तरी किमान मूल्यांशी प्रामाणिक राहणे अपेक्षित आहे.हे रयतेचे राज्य आहे.तुम्ही कोणाविरुद्ध तलवारी उपासणार ? तेव्हा आता सगळ्यांनीच जरा धीर संयमाने एक विचाराने आपल्याला नेमके काय मिळवायचे आहे आणि ते कोठून मिळवायचे आहे हे ठरवले पाहिजे.ते एकदा निश्चित झाले की मग कसे मिळवायचे हे ठरवता येईल.
( क्रमशः)
————————-
मराठा आरक्षण आंदोलनातले नासके कांदे निपटून काढा
न्या.बी जी कोळसे पाटील यांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा
भाग-२ / वाचा उद्याच्या अंकात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *