उस्मानाबाद /प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्ती सांगावा न धाडता,अचानक कोसळतात.अतिवृष्टी ही अशीच नैसर्गिक आपत्ती आहे .या पूर्वीही महापूर-भूकंपासारख्या संकटाला आपण सर्वांनी मोठ्या धीराने तोंड दिले आहे.आताही देऊया.धीर धरा,संयमाने घ्या.आम्ही आपल्या सोबत आहोत.हे संकट निवारण करू.असा दिलासा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला.उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर,उमरगा,औसा या तालुक्यातील पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी शरद पवार यांनी आज केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, दगावलेली जनावरे आणि घरांची पडझड मोठी आहे. त्यासाठी सरकार नक्की मदत करेल. मात्र राज्य शासनाला मदतीसाठी काही मर्यादा आहेत. त्यामुळे भरीव मदतनिधीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना या बाबतची माहिती दिली.
    अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी हा दौरा केला.यावेळी लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील शेतकर्‍यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज (रविवार,१८ ऑक्टोबर) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.अतिवृष्टीमुळे तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि परंडा परिसरात मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबत शेतीतील मातीही वाहून गेली आहे. हे मोठे संकट आहे. सरकारने अशा काळात खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. आपण स्वतः त्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
   शरद पवार यांनी आज सकाळी तुळजापूर येथून नुकसानग्रस्त भागातील पाहणीच्या दौर्‍याला प्रारंभ केला. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, लोहारा तालुक्यातील सास्तूर या दरम्यान ठिकठिकाणी थांबून त्यांनी शेतकर्‍यांची विचारपूस केली. रब्बीच्या पेरणीपूर्वी पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी विनंती यावेळी अनेक शेतकर्‍यांनी पवार यांच्याकडे केली. यावर पंचनाम्यासाठी येणार्‍या अधिकार्‍यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती द्या,अशा सूचनाही शरद पवार यांनी यावेळी केल्या.
  दरम्यान शरद पवार यांच्या पाठोपाठ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज (१९ ऑक्टोबर) पासून उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *