गेल्या काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र अशा दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपानं त्यांच्यावर सोपवलेली असल्यानं बिहारमध्येही ते सातत्यानं फिरतीवर होते. आज ट्विट करत फडणवीस यांनी करोना झाला असल्याची माहिती दिली.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी ट्विट करत करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली. फडणवीस म्हणाले,”लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,” असं आवाहनही फडणवीस यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील विरोधी पक्षनेते पदासह बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आहे. ते बिहारचे प्रभारी असून, गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये दौरे करत आहेत. त्याचबरोबर राज्यातीलही वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन समस्या जाणून घेत आहेत. त्यातच आता त्यांना करोना झाल्यानं सार्वजनिक जीवनापासून काही काळ दूर राहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *