औरंगाबाद /प्रतिनिधी
फी वसुली आणि पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला दिलेले ४० मुद्यांचे निवेदन यावरून ‘इरा’स्कुल आणि पालकांच्या वादात रोज नवनवीन ट्विस्ट निर्माण होत असून गत सप्ताहात घडलेल्या कथित वादावर तोडगा काढण्यासाठी पालकांचे शिष्टमंडळ शाळेत गेले असता व्यवस्थापनाने त्यांना भेट नाकारल्याचा,तसेच गेटला कुलूप लावून पालकांना शाळेसमोर ताटकळत उभे करण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे. भर पावसात पालकांना शाळेसमोर संस्थाचालकांची प्रतीक्षा करीत थांबावे लागले,मात्र तीन तास वाट पाहून आणि वांरवार संपर्क साधूनही संस्थाचालक भेटीला आले नाहीत. आधीच शिवराळश्री आणि एका पालका दरम्यान फोनवरून झालेल्या अत्यंत टोकाच्या अर्वाच्य आणि अनर्गल वि-संवादामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या सगळ्याच प्रकारची धास्ती घेतली आहे.त्यातच हा प्रकार घडल्याने पालक संतप्त झाले आहेत.दरम्यान पालकांनी संस्थेला दिलेल्या ४० मुद्यांच्या निवेदनात केवळ फीसचा मुद्दा नाही,शाळेमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे.शिक्षकांची उपलब्धता,सलगता,नियमितता तसेच शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे मुद्दे आहेत.आमचे मुद्दे चुकीचे आणि असंबद्ध असतील तर संस्थेने या बाबत आम्हाला मार्गदर्शन करावे,आमचे गैरसमज दूर करावेत अशी आमची अपेक्षा आहे.आम्हाला शाळेशी संबंध बिघडवायचे नाहीत.शेवटी आमची मुले तिथे शिकत आहेत.त्यांचे ते विद्यामंदिर आहे.आम्हाला आणि आमच्या मुलांना शाळेबद्दल आणि संस्थाचालक तसेच अन्य कर्मचारी शिक्षक यांच्याबद्दल आदरच आहे.शाळेची बदनामी व्हावी असा आमचा अजिबात हेतू नाही.परंतु काही बाबतीत शाळेने आमच्याही मताला किंमत दिली पाहिजे.कोणत्याही बाबतीत अव्वाच्या सव्वा फी मागणे,त्याचे स्पष्टीकरण न देणे,वरतून शाळेशी संबंध नसलेल्या लोकांच्या धमक्या हे प्रकार शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घडू नयेत म्हणूनच आम्ही खंबीर भूमिका घेतली असल्याचे पालकांनी म्हटले आहे.आम्हाला शाळेच्या इभ्रतीची आणि मुलांच्या भवितव्याची काळजी आहेच.पण म्हणून आम्ही आत्मसन्मान गुंडाळून ठेवावा आणि निमूटपणे कोणाच्याही शिव्या खाव्यात, वरतून तो आमचा आपसातील मामला असल्याचे सांगावे असा होत नाही.चूक मान्य असेल तर दिलदारपणे माफी मागावी.आमचे काही चुकले असेल तर आम्हीही माफी मागू.पण वरच्या पायरीवर उभे राहायचे आणि पायरी सोडून वागायचे असे चालणार नाही.असे पालकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *