तहकीकात

मोदींच्या कृषी धोरणात शेतीला उपजीविकेचा नाही तर उद्योगाचा दर्जा देण्याची आणि शेतकऱ्याला व्यापारी बनवण्याची भाषा केली जात आहे.अन्नदाता,पोशिंदा, बळीराजा, जमिनीला काळीआई म्हणणारा भूमिपुत्र धंदेवाईक व्यापारी कसा काय होऊ शकतो ? यावर स्वतः मोदी,मोदींचे मंत्री,मोदींचे आमदार-खासदार,तमाम मोदीभक्त नमोरुग्ण,सगळे संघोटे आणि मोदींचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे लाभार्थी तसेच राष्ट्रपती भवनापासून विविध स्वायत्त संस्था,प्रसारमाध्यमे,प्रशासनातील लाभार्थी यांचे एकच उत्तर आहे,तुम्हाला शेतकऱ्यांचे बरे झालेले पाहवत नाही.त्याने असेच हालअपेष्टात रहावे,अस्मानी सुलतानीच्या दुष्टचक्रात भरडावे,कर्जात खितपत पडावे, आत्महत्या करत राहाव्या,असे तुम्हाला वाटते.मोदी त्यांचे कल्याण करायला निघाले आहेत तर तुमच्या पोटात दुखतंय.इतकाच शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर मग इतकी वर्ष शेतकऱ्यांसाठी काय केले ? लुटीचीच व्यवस्था केली.इत्यादी वगैरे.दुर्दैवाची बाब म्हणजे मोहक शब्दात विणलेल्या या मोदींच्या मायाजालात शेतकरी २०१४ ला अडकला तो अजूनही बाहेर आलेला नाही.नव्या कृषी धोरणामुळे कदाचित तो आणखीनाच फसण्याची शक्यता आहे.कोणालाही अमुक अमुक केले तर तू एकदम श्रीमंत होशील,तुला फायदा होईल असे म्हटले तर त्याला तो मार्ग हवाहवासा वाटेलाच,पण ती फसवी दरी असेल,शिकाऱ्यांचा फासा असेल तर ? समोर जेवणाचे ताट ठेवून बसायचा पाट काढून घ्यायचा आणि नंतर हातही बांधून टाकायचे.म्हणजे मग समोरच्या पंचपक्कवानांच्या ताटावर कुत्री-मांजरं जोगणार.उद्याच्या या असल्या शाश्वत उपासमारी पेक्षा आपल्या हक्काची चटणी भाकरी काय वाईट ? पण शेतकऱ्यांना अजूनही हा धोका नीटपणे लक्षात आलेला नाही.
    पंचतंत्रातली एक बोधकथा येथे उदुक्त करावी वाटते.एका तलावातील मासे,बेडूक,कासव आदींची शिकार करण्यासाठी दोन लबाड बगळ्यांनी अशी अफवा पसरवली की थोड्याच दिवसात हे तळे अटणार आहे.तेव्हा दुसरीकडे कधीही न आटणाऱ्या तळ्याकडे चला.आम्ही तुम्हाला तिकडे सुरक्षित पोहचवतो.तळ्यातल्या सगळ्या जलचरांना बगळ्यांनी पसरवलेल्या तळे अटण्याच्या अफवेवर विश्वास ठेऊन  स्थलांतराला तयारी दाखवली.त्यासाठी त्या बगळ्यांनी एक काठी आणली.दोन बंगळुयानी दोन्ही टोकांना काठी पकडायची आणि मासे,बेडूक,कासवांनी ही काठी तोंडात पकडायची.मग बगळे आकाशात उडायचे आणि थोडे दूर जाऊन काठी सोडून द्यायचे.जमिनीवर आपटून जलचर मेला की त्याचा चट्टामट्टा करायचे.त्यांनी सांगितलेले  ते कधीही न आटणारे सुरक्षित तळे कोणत्याही जलचरला पाहायला मिळाले नाही.सगळे जलचर बगळ्यांच्या पोटात गेले.बस पंचतंत्राच्या कथेतील हा बोध जरी शेतकऱ्यांनी लक्षात घेतला तरी मोदींच्या कृषी धोरणातील गौडबंगाल लक्षात येईल.
  आता पुढील मुद्यांचा जरा बारकाईने वाचून डोळसपणे विचार करा. उदाहरणार्थ नवीन कृषी धोरणात
कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सहाय्य) विधेयक, यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची खरेदी विक्री करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कृषीमाल विकण्यास स्वातंत्र्य मिळेल तसंच चांगला भाव मिळेल. असं केंद्र सरकारचे म्हणणं आहे. प्रत्यक्षात बघितलं तर बाजार समित्या म्हणजे हमीभाव मिळण्याचं हक्काचं ठिकाण आहे आणि नव्या कायद्यानुसार बाजार समित्यांच्या बाहेर कृषीमाल विकल्यास हमीभाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही.बाजार समित्याचं अस्तित्व कायम ठेवलं जाईल. असं केंद्र सरकार सांगत असलं तरी या कायद्याचा बारकाईने अभ्यास केल्यास नवा कायदा बाजार समित्यांना संपुष्टात आणणार असल्याचं स्पष्ट होतं. नव्या कायद्यात सेक्शन २(एम) नुसार ट्रेड एरिया मध्ये बाजार समित्यांचा समावेशच केलेला नाही. तसंच ट्रेड एरिया मध्ये म्हणजेच बाजार समित्यांच्या बाहेर व्यापाऱ्यांना कुठलेच कर लागणार नाहीत. त्यामुळे बाजार समित्यामध्ये व्यापारी खरेदी करणारच नाहीत. परिणामी बाजार समित्या ओस पडून नव्या कायद्याने बाजार समित्यांचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बाजार समित्यांमध्ये नोंदणीकृत आणि विश्वासार्ह व्यापारी असतात. नव्या कायद्याने पॅन कार्ड असलेला कोणीही व्यक्ती शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकणार आहे. तसंच बड्या कंपन्या, बाहेरील मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल विकत घेतील, यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास न्यायालयातही दाद मागता येत होती. परंतु नव्या कायद्यानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला जाणार आहे. शेतकरी आणि मोठ्या कंपन्या यांच्या वादात इथं शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.एकूणच बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि बाजार समित्याचं अस्तित्व समाप्त होणार नाही. याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच वादाचं निराकरण करणाऱ्या लवादांनाही वेळेचं बंधन असणं आवश्यक आहे.शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) हमीभाव करार आणि कृषी सेवा विधेयक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संदर्भातलं आहे. करार शेतीची संकल्पना जेथून उगम पावली त्या अमेरिका, युरोपीय देशांमध्येच करार शेतीचं मॉडेल अयशस्वी ठरलंय. या देशांमध्ये मोठ्या कंपन्यांची एकाधिकारशाही वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालंय. करार शेती करताना मोठ्या कंपन्या आणि सामान्य शेतकरी यांच्यात करार केले जातील, करारांमधील बारीक-सारीक अटी-शर्ती सामान्य शेतकऱ्यांना समजतील का? या अटी-शर्ती ठरवताना शेतकरी या कंपन्यांसोबत बोलणी करू शकतील का? या बाबींचाही विचार करणं आवश्यक आहे.
   आज देशातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक तसंच मोठ्या प्रमाणात असंघटित असल्याने करार शेतीने शेतकऱ्यांचं शोषण होऊन मोठया कंपन्यांची एकाधिकारशाही निर्माण होणार नाही. याची काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच युरोप, अमेरिकेत करार शेती अयशस्वी का ठरली? याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे.अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक हे जीवनावश्यक वस्तू कायद्यामधील स्टॉक लिमिट संदर्भात आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यातील स्टॉक लिमिटच्या बंधनांमुळं कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस यामध्ये गुंतवणूक होऊ न शकल्याने पायाभूत सुविधांचा विकास होत नाही. त्यासाठी स्टॉक लिमिट संदर्भातल्या मर्यादा उठवणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणे आहे. परंतु या मर्यादा उठवल्याने मोठ्या कंपन्या अथवा व्यापारी यांच्याकडून साठेबाजी होण्याचा तसेच बाजारातील किंमती प्रभावित करण्याचा धोका उद्भवू शकतो.
   याचा शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना फटका बसून साठेबाजांना फायदा होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टाळण्यासाठी साखरेप्रमाणे कमाल विक्री किंमत ठरवता येईल का? याचा विचार करणं आवश्यक आहे. बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी बाजार समितीच्या नियमांमध्ये व कायद्यांमध्ये असलेल्या त्रुटी राज्य व केंद्र सरकारने एकत्र येऊन दूर करून बाजार समित्यांना सक्षम करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न केंद्र सरकारने सत्तेत येताना दाखवलं होतं, पण हे फक्त स्वप्नच राहिलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्याच्या कृषीमालाची हमीभावाने खरेदी होणं गरजेचं आहे. यासाठी हमीभावाचा प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळावा या दृष्टीने सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या आयुष्यावर परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या कायद्यांबाबत संसदेत आणि संसदेबाहेरही विस्तृत चर्चा होणं आवश्यक असताना आज केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर कायदे करणार असेल तर त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण देशात उमटल्याशिवाय राहणार नाही. ही विधेयके पास करताना केंद्र सरकारने विरोधी पक्षांना जरी विश्वासात घेतलं नाही. तरी किमान ज्या अन्नदात्यांसाठी कायदे बनवतोय, त्यांना तरी केंद्र सरकारने विश्वासात घ्यायला हवं होतं. शेतकऱ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध का होतोय? हे जाणून घेण्याचा सरकारने थोडासाही प्रयत्न केला नाही, याची खंत वाटते.शेतकऱ्याला चांगला भाव मिळत असेल तर आमचा विरोध नाही, पण खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर काय? सरकार तो शेतमाल विकत घेणार का? बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. या प्रश्नांची खरी उत्तरं सरकारने द्यायला हवीत.
       नोटाबंदी, जीएसटी कायद्याच्या वेळेस देखील पंतप्रधानांनी देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं होतं आणि आज कृषी सुधारणांसंदर्भात देखील पंतप्रधान ऐतिहासिक सुधारणा असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळं मला जास्तच काळजी वाटतेय. ज्याप्रमाणे नोटबंदीच्या यातना सामान्यांना भोगाव्या लागल्या, जीएसटीच्या यातना छोट्या उद्योजक-व्यापाऱ्यांना, राज्य सरकारांना भोगाव्या लागत आहेत, त्याच यातना नव्या ‘ऐतिहासिक’ कायद्याने शेतकऱ्यांना भोगाव्या लागू नयेत, हीच खरी भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *