शरद पवारांचा मोदींवर घणाघात

नवी दिल्ली /वृत्तसंस्था
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी आज तातडीने चर्चा केली. ‘अशा आकस्मिक निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल,अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे.हा निर्णय शहरी लोकांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान करणारा निर्णय आहे.असे शरद पवार यांनी म्हटले आहे .या निर्णयाला विरोध करत महाराष्ट्रासह देशातील शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कांदा उत्पादक भागात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.’निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल असेही पवार यांनी म्हटले आहे.या निर्णयामुळे कांदा निर्यातीच्या बाबतीत भारत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात बनेल. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा  फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देश घेतील,शिवाय यात भारतीय कांदा उत्पादकांची वाताहत होईल. हा धोका पवार यांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिला.यावर कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे तसेच बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीं मुळे घेण्यात आला आहे असे उत्तर गोयल यांनी दिले आहे.मात्र देशात कांद्याच्या किमती वाढल्या तर शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे मिळतील.शहरी नागरिकांना परवडत नसेल तर त्यांनी कांदा खाऊ नये असे पवार म्हणाले.दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याचा निषेध म्हणून नाशिक जिल्ह्यातील उमराना, सटाणा, नागपूर आदी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडून शेतकऱ्यांनी रास्ता रोको  केला. सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. निर्णय ना बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *