बळजबरीच्या आवाजी बहुमताने राज्यसभेतही पास

नवी दिल्ली /वृत्तसंस्था
मोदी सरकारने आणलेले शेतकऱ्यांचा बळी घेणारे कृषी संशोधन विधेयक आज बळजबरीच्या आवाजी बहुमताने राज्यसभेतही पास करून घेण्यात आले,दरम्यान कृषि क्षेत्राशी संबंधित विधेयकावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सरकारच्या कृषीविषयक सुधारणा  विधेयकांना मंजुरी देण्यास विरोधकांनी तीव्र विरोध केला.काँग्रेससह विरोधी पक्षातील सर्वच खासदार यावेळी आक्रमक झालेले बघायला मिळाले. प्रस्तावित कायदे शेती आणि शेतकऱ्यांच्या लुटीचे कारस्थान आहे. त्यामुळे आम्ही या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसने सरकारवर टीका केली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील हौद्यात उतरून नियमावली पुस्तिका फाडली. गदरोळ सुरू झाल्याने सभागृहाचे  कामकाज काहीकाळासाठी  तहकूब करण्यात आले.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत मांडली. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असे तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितले.यावर सभागृहात काँग्रेससह विरोधी बाकांवरील पक्षांनी विधेयकांवरून सरकारवर टीका केली. द्रमुकेचे खासदार एलेंगोवन म्हणाले,की देशाच्या एकूण जीडीपीत शेतकऱ्यांचे  योगदान २० टक्के आहे. मात्र त्यांना या विधेयकांद्वार गुलाम बनवले  जाईल. हे विधेयक शेतकऱ्यांना मारून टाकतील आणि लुटण्याची वस्तू बनवून टाकतील, अशी टीका त्यांनी केली.काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा म्हणाले,की या विधेयकांना सहमती देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करण्यासारखे आहे..
     त्यावर कृषिमंत्री तोमर यांनी एमएसपीशी दोन्ही विधेयकांचा काडीचाही संबंध नाही. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात आहे आणि केली जाईल. यावर कुणीही शंका घेण्याची गरज नाही. मात्र, यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. काँग्रेस, आम आदमी पक्षाचे खासदार सभापतीच्या समोरील हौद्यात उतरले. गुलाम नबी आझाद यांनी चर्चेची वेळ वाढवण्याची मागणी केली.मात्र त्याला नकार देत मंत्र्यांनी आपले निवेदन गदारोळात वाचून पूर्ण केले,त्यानंतर सभापतींनी त्यावर आवाजी बहुमत घेत विधेयके पास झाल्याचे घोषित केले.त्यावर संतप्त झालेल्या खासदारांनी सभापतींच्या समोरील माईक तोडले. तर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी थेट सभापतीसमोर जाऊन सभागृह नियमावली पुस्तिका फाडली.
   शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारला धारेवर धरत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना लक्ष्य केले.


मोदींच्या भूलथापांना बळी पडून या देशातल्या शेतकऱ्यांनीच त्यांना एकदा नाही तर दुसऱ्यांदा पुन्हा बहुमतासह निवडून दिले.मोदींनी दिलेल्या सहा हजारात शेतकरी खुश आहेत.पण त्या बदल्यात खाली काय जळतंय ते अजूनही शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले नाही.मोदींनी आणलेली कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांच्या बर्बादीचा जाहीरनामा आहे.हे भूत शेतकऱ्यांनीच जागे केले ,आता ते शेतकऱ्यांच्या छाताडावर बसले आहे.बसा आता ‘धुऱ्या’ वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *