पुणे  /प्रतिनिधी
राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असे विधान आपण केलेच नाही,या संदर्भातील लोकमतमध्ये छापून आलेली बातमी धादांत खोटी आहे,ते लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांचे खासगी ‘आत्म संशोधन’ आहे असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
दैनिक लोकमत मध्ये आज (२० सप्टेंबर) प्रकाशित झालेले वृत्त वाचून आपणाला धक्का बसला.लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी आपली मुलाखत घेतली.त्यात राज्यातील कायदा व सुव्यवस्था,कोरोना,मराठा आंदोलन,शेतकरी आंदोलन,सुशांत राजपूत प्रकरण,कंगना वाद,अशा अनेक विषयावर चर्चा झाली.दरम्यान त्यांनी राज्यातील काही उच्च पदस्थ पोलीस अधिकारी सरकारला सहकार्य करीत नाहीत,सूचना आणि आदेश पाळत नाहीत,निर्णयांची गोपनीयता पाळत नाहीत,इतकेच नाही तर विरोधकांना माहिती पुरवतात हे खरे आहे काय ? हे अधिकारी सरकार विरोधी कारवाया करतात असा आपणास संशय आहे का ? काही अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले हे खरे आहे काय ? असा प्रश्न उपस्थित केला.हा प्रश्न अनाहूत आणि अनपेक्षित होता,या प्रश्नाला आपण आजिबात दुजोरा दिला नाही.होकारही दर्शवला नाही.उलट ही नवीनच माहिती आपण सांगता आहात,या बाबत मला काही कल्पना नाही.असे काही असेल असे मला वाटत नाही ,तरी मी पडताळा घेईन असे आपण म्हणालो.असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.लोकमत वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे.आपण यासंदर्भातील युट्यूबर असलेला मुलाखतीचा  व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल.असे अनिल देशमुख म्हणाले.राज्यातील चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यात एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. मात्र, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, असे गृहमंत्री देशमुख बोलल्याचे वृत्त दैनिक लोकमत या वर्तमानपत्रात छापून आले.लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा त्यासाठी संदर्भ देण्यात आला होता.मात्र मुलाखतीत आपण असे बोललोच नाही असे देशमुख म्हणाले आहेत.दैनिक लोकमत मध्ये २० सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या संबंधित वृत्तात,लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे.राज्यातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्री आणि आमदारांना तुमच्या अनेक फायली आमच्याकडे आहेत,हे सरकार लवकरच पडणार आहे,सावध रहा आणि स्वतःला वाचवा,त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.फडणवीस आणि आमचे संबंध चांगले आहेत.अशा शब्दांत धमकावणे,आणि आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राजीनामा द्यायला सांगण्याचेही प्रकार झाले. हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अनिल देखमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चेनंतर हे प्रकरण योग्य प्रकारे मार्गी लावण्यात आले असे धांदात खोटे वृत्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्याने दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले.या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित वक्तव्याचा इन्कार करत ते लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांचे वैयक्तिक संशोधन असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *