मुंबई /प्रतिनिधी
राज्यसभेत घडलेला प्रकार निंदनीय आहे.पन्नास वर्षांच्या संसदीय राजकारणात इतका शोचनीय प्रसंग कधी घडला नव्हता.सरकारची भूमिका आडमुठेपणाची आहे.विरोधकांची मागणी विधेयकावर चर्चा करण्याची होती.पण सरकारला ते नको आहे.मग विषय लोकांपर्यंत जाणार कसा.आमची बाजू पटली नाही आणि तुमची योग्य वाटली तर लोक तुम्हाला पाठिंबा देतील.पण काय आहे ते लोकांना कळू तर द्या.इथे खरी लपवाछपवी आहे.एका ओळीचा कायदा वाचून त्यातील खाचाखोचा कळत नसतात.त्याचे दुष्परिणाम नंतर दिसतात.पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.त्यासाठी विधेयकावर चर्चा अपेक्षित होती.पण ते जाणीवपूर्वक घडू दिले नाही.चर्चाच होणार नसेल तर सभागृह आहेच कशाला ? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे.
   मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली,यावेळी त्यांनी सदस्यांच्या निलंबनाचा निषेध करीत त्यांच्या अन्नत्याग आंदोलनात मी देखील सामील असल्याचे सांगत अन्नत्याग घोषित केला.
————
सरकारच्या ‘चहा’ ला नकार


सोमवारी दुपारपासून धरणे आंदोलनावर बसलेल्या या खासदारांच्या भेटीसाठी आज मंगळवारी सकाळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह स्वत: पोहचले. हरिवंश यांनी ‘गांधिगिरी’ करत या खासदारांसाठी आपल्यासोबत चहादेखील आणला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा चहा पिण्यासही नकार दिल्याने त्यांची ही गांधीगिरी फसली. यावेळी त्यांनी नाराज खासदारांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला.दरम्यान सरकारच्या वतीने  कुणीही आमची विचारपूस करण्यासाठी आलेले नाहीत. मात्र विरोधी पक्षाचे अनेक नेते आले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबाही दिला. आम्ही हे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत’, असे काँग्रेसचे खासदार रिपून बोरा यांनी यावेळी म्हटले आहे.
—————–
उपसभापतीही करणार आत्मक्लेश
 ज्यांनी राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना निलंबित केले आणि ज्यांच्यासमोर हा सगळा प्रकार घडला त्या उपसभापती हरिवंश यांनीही आपण आत्मक्लेश करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे आपण दु:खी झाल्याचे सांगत उपसभापती हरिवंश यांनी आपण  एका दिवस उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे.उपसभापतींनी या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून माहिती दिली आहे.दरम्यान मोदी यांनी हरिवंश यांच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक करत,ज्यांनी हल्ला केला त्यांना चहा घेऊन जाण्यात मनाची महानता आहे असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *