लोकपत्र विशेष
——————————-तुकाराम मुंडे या एका सनदी अधिकाऱ्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली होणे ही बातमी आहे पण त्यात त्या अधिकाऱ्यावर अन्याय,अवमान काय आहे ? जिथे सुप्रीम कोर्ट बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसात वाद होऊ नयेत म्हणून सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येची चौकशी सीबीआय कडे सोपवते तिथे नागपूर महापालिकेत महापौर आणि आयुक्तात वाद होऊन जनहिताच्या कामांचा खोळंबा होऊ नये या उदात्त हेतूने प्रशासनाने नागपूर मनपा आयुक्त पदावरून तुकाराम मुंडेंची बदली केली असेल तर त्यात आदळआपट करण्यासारखे काय आहे ? ही काय महाराष्ट्रातली सरकारी अधिकाऱ्याची सोडा ; तुकाराम मुंडेंची पहिली बदली थोडीच आहे.तेव्हा उगाच चमकोगिरी नको.नाशिक मधल्या ‘लोक’नाट्याची नागपुरात पुनरावृत्ती नको.   महाराष्ट्रातील मराठी माणसांची एक गम्मत आहे.एखाद्या माणसावर भरोसा टाकला की मग तो नागडा नाचला तरी आम्ही त्याचे डोळे झाकून कौतुकच करणार.त्याच्या दोष,चुका आणि खोटेपणाचेही समर्थन करणार.त्याच्या विरोधात कोणी काही बोलला तर त्यालाच ठेचून काढणार.मराठी माणसांच्या या अंधश्रद्धेची राजकीय,सामाजिक तसेच कला,क्रीडा,साहित्य अशा विविध क्षेत्रातील अनेक उदाहरणे देता येतील.प्रशासकीय म्हणजेच सनदी सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बाबतीतही आम्ही मराठी माणसे असेच नको त्या अधिकाऱ्याचे नको तितके गौरवीकरण करतो.त्याच्यात असले नसलेले गुण त्याला जोडतो.तो अधिकारी म्हणजे कोणीतरी सत्य आणि न्यायासाठी लढणारा हरिश्चंद्राचाच त्यागमूर्ती अवतार आहे.असे त्याचे गोडवे गाईले जातात.मग त्या आधिकाऱ्यालाही आपण कोणीतरी आगळे वेगळे दबंग-सिंघम वगैरे असल्याचा गैरसमज होतो.पुढचा टप्पा अर्थात सैराट होण्याचा असतो.सध्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होऊन शांत बसलेले सुनील केंद्रेकर हे या सैराट पणाचे एक बदनाम उदाहरण आहे.त्यांनीही एक काळ गाजवला.असेच आणखी एक प्रसिद्धीनायक पोलीस अधिकारी आहेत विश्वास नांगरे पाटील.ते कामात किती ‘दक्ष’आहेत हे अलहिदा.पण त्यांच्याही कामाची आणि प्रसिद्धीची पद्धत ‘एक हात लाकूड नऊ हात ढलपी’ अशीच आहे.हाच ‘कामा पेक्षा बाम’ फार्मुला असणारे आणखी एक (‘कु’ की ‘सु’ ते तुम्हीच ठरवा ) प्रसिद्ध अधिकारी आहेत ते म्हणजे
तुकाराम हरिभाऊ मुंडे.महाराष्ट्राचे,त्यातही मराठवाड्यातले,बीडजिल्ह्यातल्या ताडसोना या खेड्यात जन्मलेले,जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले,बहुजन भटक्या विमुक्त वंजारी समाजातले,गरीबी अनुभवलेले,स्वकष्टाने शिक्षण घेऊन सनदी अधिकारावर पोहचलेले आणि भ्रष्टाचाराचा कलंक नसलेले अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांच्याबद्दल आम्हालाही आत्मीयता आणि अभिमान आहेच.आदरही आहे.पण म्हणून तुकाराम मुंडेंनी कायम तोऱ्यात आणि आरेरावीने वागावे.सहकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी,पत्रकार अगदी महापौर आणि मंत्र्यांनाही कस्पटासमान लेखावे.हे जरा अतीच झाले.घटनेने सनदी अधिकाऱ्यांना काही प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत.परंतु प्रशासकीय अधिकारी म्हणजे सर्वोसर्वा नसतो.भारतीय लोकशाही व्यवस्थेत जनहिताच्या प्रश्नांना अधिक महत्व दिले जाणे आवश्यक असते.जनहिताच्या मुद्यावर प्रत्येकच वेळी नियम आणि कायद्यावर बोट ठेऊन चालत नसते.शेवटी नियम कायदे जनतेसाठीच असतात,गैर काही होणार नाही याची काळजी घेणे ठीक पण वेळ प्रसंगी नियमांना मुरड घालावी लागतेच.या बाबत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एका प्रसंगी मांडलेले विचार दिशादर्शक आहेत.ते असे म्हणाले होते की ‘ पुढाऱ्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकले तर महाराष्ट्राचे कल्याण होत राहील’ यशवंतरावांच्या या सल्ल्यातले मर्म न समजलेले तुकाराम मुंडे यांच्या सारखे काही अधिकारी स्वतःला ‘राखणदार’ समजायला लागतात आणि मग त्यांची स्थिती ‘असून अडचण,नसून खोळंबा’अशी होऊन बसते.नुकतीच तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी झाली.त्यांचे चंबू गबाळे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदावर पाठवले आहे.आपल्याला लवकरच वळकटी आवळून अन्यत्र पथारी पसरावी लागणार याची तुकाराम मुंडेंना बहुदा दोन दिवसापूर्वीच जाणीव झालेली असावी.त्यामुळे त्यांनी आपणास कोरोना झाल्याचे आणि आपण कोरंटाईन होत असल्याचे जाहीर केले.खरे तर शासनाने त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळून पहिली पाहिजे.त्यांना कोरोना लागण असेल तर प्रश्न नाही पण लागण नसेल आणि त्यांनी खोटी माहिती प्रस्तुत केली असेल तर एक जबाबदार सनदी अधिकारी असूनही कोरोनासारख्या संवेदनशील विषयाशी संबंधित स्वतः बद्दल खोटी माहिती पसरवली म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले पाहिजे.
बदलीचे आदेश आल्यानंतरही मुंडे अजूनही एखाद्या राजकीय नेत्या प्रमाणे स्वतःच्या कर्तव्यदक्षता,प्रामाणिकता,कार्यनिष्ठेचे गोडवे गात स्वतःला हरिश्चंद्राचे अवतार ठरवू पाहत आहेत.समजा तुकाराम मुंडे सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार आहेत.मग राज्यातले  इतर आधिकारी काय पापाचे रांजण भरतात ? तुकाराम मुंडे जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी चांगले काम केले असेलही.पण त्यात त्यांनी कोणते स्वर्गातून पारिजातकाचे झाड जमिनीवर आणून लावले ? सनदी अधिकाऱ्याचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या.त्या सर्वोत्तम ठरल्या तर त्यांना पुरस्कार मिळतील.पदोन्नती मिळतील.गलेलठ्ठ पगार आणि भरमसाठ सोयी सुविधा तर मिळतच आहेत.पण तुकाराम मुंडे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांचे तेवढ्याने समाधान होत नाही.का कोण जाणे त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा अहंकार आणि आत्मगंड आहे.सहकाऱ्यांशी,हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी,अगदी वरिष्ठांशी सुद्धा ते याच ऐरोगंटली वागतात.लहानपणी आणि संघर्षाच्या काळात भोगाव्या लागलेल्या गरीबी,अभाव आणि कदाचित कळत-नकळत झालेल्या अवमान अवहेलनेमुळे त्यांच्या मनात कुठेतरी त्वेष आणि सुडाची भावना कोंडलेली आहे.त्यातून त्यांचा स्वभाव हा असा अडेलतट्टू झाला असण्याची शक्यता आहे.ते निष्कपट आणि प्रामाणिक असतीलही.हलगर्जीपणा,दप्तर दिरंगाई,ढिसाळपणा,गलथानपणा,भ्रष्टाचार,गैरकारभार,कामात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप ते खपवून घेत नाहीत.कोणाच्या दबावात येत नाहीत.मोह आणि अमिषाला बळी पडत नाहीत,हे सगळे खरे मानून चालूया.पण मग स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी त्यांना महिलांवर स्वतःचे कपडे फाडून घेतल्याचे आरोपही करावे लागतात का ? तुकाराम मुंडे यांनी नागपूरच्या काही महिलांवर असा आरोप  केला आहे, या महिला भाजपच्या कार्यकर्त्या आहेत.आपल्या बदलीमागेही भाजपचाच एक बडा नेता असल्याचे तुकाराम मुंडे म्हणतात.कदाचित तुकाराम मुंडेंच्या म्हणण्यात तथ्य असू शकेल.पण पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते ही साधी महान तुकाराम मुंडे दरवेळी का विसरतात ? १५ वर्षात १६ बदल्या ही काही भूषणावह बाब नव्हे ; आणि एवढा प्रसिद्धीचा सोस ही बरा नव्हे.
—————–तुकाराम मुंडेंच्या १५ वर्षातील १६ बदल्या

१) सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट २००५  ते ऑगस्ट २००७)
२) नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर २००७  ते डिसेंबर २००७ )
३) नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी २००८ ते मार्च २००९)
४) नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च २००९  ते जुलै २००९)
५) वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै २००९  ते मे २०१०)
६) मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून २०१०  ते जून २०११)
७) जालन्याचे जिल्हाधिकारी (जून २०११  ते ऑगस्ट २०१२)
८) मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर २०१२  ते नोव्हेंबर २०१४)
९) सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१६)
१०)नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे २००६ ते मार्च २०१७)
११)पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८)
१२) नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी २०१८ ते नोव्हेबर २०१८)
13) नियोजन विभाग, मंत्रालय (नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९)
१४)एडस नियंत्रण प्रकल्प संचालक ( फेब्रुवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९)
१५) नागपूर महापालिका आयुक्त( सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२०)
१६) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव ( २०२० ते…) 

2 thought on “तुकाराम मुंडे तेवढे सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार मग इतर आधिकारी काय पापाचे रांजण भरतात ?”
 1. शेवटच्या काही ओळी . . .
  * ) ” पाण्यात राहून माशाशी वैर
  करायचे नसते ”
  मुळ म्हण . . .
  ” पानीमे रहेके मगरमछसे बैर ? ”
  मगरमछ = ? ? ?
  * ) ही साधी महान तुकाराम मुंंढे
  दर वेळी का विसरतात.
  महान च्या ऐवजी म्हण असावं.

 2. १०)नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे २००६ ते मार्च २०१७)

  कृपया कार्यकाळ दुरुस्त करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *