अग्रलेख

द ग्रेट ‘बैजू’ बावरा

कोकणात नारळ खरेच स्वस्त असतो का माहित नाही.बहुदा नसावा.पण असे म्हणतात खरे.त्याचा मतितार्थ असा की माणसाच्या गुणवत्तेची महती कळायला त्याला आधी जग जिंकावं लागतं,तेव्हा कुठे आपल्याला त्याची किंमत कळते.औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठात फोटोग्राफीची कला आणि तंत्रदानाचे प्रशिक्षण देणारे बैजू पाटील हे असेच एक नाव.सिर्फ नाम ही काफी है असे ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल असा हा मनस्वी आणि कलासक्त छायाचित्रकार.त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.गेली २५-३० वर्षे हा मनुष्य सातत्याने छयाचित्रणाच्या कलेत विविध प्रयोग करीत आहेत.आवड किंवा छंद म्हणून नव्हे.व्यवसाय म्हणूनही नव्हे.वेड म्हणून.तो मॅड आहे.पक्का वेडा.बैजू बावरा.वाइल्ड लाईफ,त्यातही पक्षीजीवन हा बैजूचा खास आवडीचा प्रांत.नुकताच त्यांना टर्न ऍन्ड टाऊन व नॅशनल जॉग्रफिक यांनी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या स्पर्धेत आऊटस्टँडिंग फोटोग्राफर २०-२० हा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले आहे.छायाचित्रणक्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा प्रतिष्ठेचा मानला जातो.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तितके कमीच आहेत.आपल्या माणसांच्या यशाचा गौरव करण्यात आपण नेहमीच हात आखडता घेतो.किंबहुना कंजुषीच करतो.पण बैजू सारखी अवलिया माणसं त्यावरही मात करतात.आज त्यांना आम्ही अग्रलेखाच्या जागेत स्थान दिले याचे कारण ते आमचे परिचित अथवा मातृसंस्थेतील सहोदर आहेत म्हणून नव्हे.हा खरोखरीच कस्तुरी मृग आहे.त्याच्या कला नाभीतला सुगंध जागतिक पातळीवर दरवळला आहे.हे न जाणावे किंवा जाणवूनही अनुल्लेखावे इतके आम्ही करंटे नक्कीच नाही आहोत .रॉयल अर्बट हॉल, लंडन येथे त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरले होते.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत फॅशन, वेडिंग, स्पोर्ट्स, फाईन आर्ट, वाइल्ड लाईफ अशा एकूण दहा वेगवेगळ्या विभागांमध्ये संपूर्ण जगातून जवळपास ४५ हजार छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता.जगातील दहा विख्यात व तज्ञ छायाचित्रकार या स्पर्धेसाठी परीक्षक होते. त्यात बैजू पाटील यांचे छायाचित्र सर्वोत्कृष्ट ठरले.वर्ल्डकप फोटो कॉन्टेस्ट पदक मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.ही केवळ एमजीएम विद्यापीठ,दैनिक लोकपत्र,औरंगाबादकर किंवा मराठवाडा अथवा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.पुरस्कार प्राप्त फोटो त्यांनी राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्यात काढलेला आहे. मागील पाच वर्षांपासून ते या छायाचित्रासाठी योग्य क्षणाची प्रतीक्षा करीत होते. हिवाळ्यात तिथे  प्रचंड कडाक्याची थंडी पडते.अशावेळी तेथील ही माकडं थंडीपासून बचाव करण्यासाठी एकमेकांचा आधार घेत एकमेकांना बिलगून ऊब घेत थंडीचा सामना करतात व सकाळी ऊन पडल्यावर वेगळी होतात.निसर्गातील या किमयेचे जिवंत आणि सजीव छायाचित्र टिपण्यासाठी बैजू तेवढ्या थंडीत रात्रभर कॅमेरा लावून बसला होता.अखेर पहाटे  सहा वाजता पाहिजे ती मुव्हमेंट मिळाली.बैजू सांगतो हा क्षण थरारक होता.फोटो काढता वेळी सगळी माकडं एका झाडाच्या फांदीवर एकमेकांना बिलगून शांतपणे झोपलेली होती. टोळीचा म्होरक्या मात्र जागा होता.तो अर्थात सुरक्षेसाठी होता.त्याचं माझ्या प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष होतं.जराशी आगळीक धोक्याची होती.ती संयमाची कसोटी होती.मुख्य म्हणजे त्या म्होरक्याला माझ्या प्रामाणिकतेचा विश्वास हवा होता.तिथे भाषा हे माध्यम कुचकामी होते.नजर हालचालींवरच सगळे निभवायचे होते.सुदैवाने त्याचा माझा शब्दाविण संवाद झाला,आणि फोटो क्लिक झाला.हा प्रसंग ऐकण किती थरारक आहे,खरेच एकदा बैजू सोबत आउटडोअरला जायला हवं.द ग्रेट  बैजू .