खट्टा मिठा

कम कोरोना कम

कोणाला कोरोनाची बाधा होणे हा काही विनोदाचा विषय नव्हे.कोरोना म्हणजे गंमत नव्हे.पण रामदास आठवलेंच्या बाबतीत कोणतीच गोष्ट गंभीर असू शकत नाही.त्यांना कोरोना झाला या बातमीची लोक मजा घेत आहेत.याला ब्लॅक कॉमेडी म्हणा की आणखी काही,पण आहे ते असे आहे.गो कोरोना गो म्हणणाऱ्या आठवलेंनाही कोरोनाने गाठले आहे.त्यावरची त्यांची एखादी ताजी कविता अजून बाहेर आलेली नाही,पण येणार हे नक्की.सोशल मीडियावर मात्र आठवलेंच्या कोरोनावर चक्क महाकवीसंमेलन सुरु झाले आहे.’कम कोरोना कम’ असे या काव्यकट्ट्याला नाव देण्यात आलंय.माणसाचं नाव एकदा कानफाट्या पडलं की हे असं होतं.एके काळी,म्हणजे जवानीत आठवले   बऱ्यापैकी आक्रमक वगैरे होते.म्हणजे ते रस्त्यावर उतरले की यंत्रणा हादरत असे.त्यावेळी त्यांची अक्कल देखील ठिकाणावर होती.पण पुढे ती सत्तेपुढे गहाण पडली आणि नियमित हप्ते न भरल्याने बुडाली.ब्लॅक पँथरचा चक्क खवले मांजर झाला.ते विनोद करतात,कविता करतात.पण त्यांना  विनोदाचा सेन्स ऑफ ह्युमर नाही.कवितेचेही अंग नाही.(आहेत ते अंगविक्षेप) पण या दोन्ही गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात,आपण करतोय ते सगळे हास्यास्पद आहे,विदुषकी चाळ्यात मोडते हे कळत असूनही ते ‘येडा बनके पेढा’खातात.मंत्री म्हणून शपथ घेताना ते स्वतःचे नावच विसरले होते.पण हे मोदींना हसवण्यासाठी मुद्दाम केलेले नाटक होते हे अनेकांना माहित नसावे.एक लढवय्या कार्यकर्ता आता खुशमस्कऱ्या झाला आहे,हे पुरोगामी चळवळीचे दुर्दैवच म्हणायचे.त्यांचे ते विदुषकी थाटाचे चटयापट्यांचे भडक कपडे,कायम अफू-गांजा चढवल्या सारखे बोलणे आणि त्यांची अखंड वाहणारी हास्यास्पद काव्यप्रतिभा (?) सगळीच गम्मत आहे.कम कोरोना कम.