कोणता पुतळा असणार जगात सर्वात उंच ? सरदार पटेल,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर?

स्मारकाचे गौडबंगाल | लोकपत्र विशेष :


येत्या ३१ ऑक्टोबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री,महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी,आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लौकिक प्राप्त लोकनेते  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे.या निमित्त गुजरात मधील सरदार सरोवरा समोर सरदार पटेल यांचा भव्य असा लोह पुतळा उभारण्यात आला असून ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
     सरदार पटेल यांचा हा पुतळा १८२  मीटर एवढा उंच आहे.स्टॅचू ऑफ युनिटी असे नाव या पुतळ्याला दिले आहे आणि हा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.जर हा पुतळा खरेच १८२ मीटर उंच असेल तर तो सध्यातरी जगातला सर्वात उंच पुतळा ठरतो यात शंका नाही.मात्र पुतळ्याची उंची पायापासून डोक्यापर्यंत मानायची की पुतळ्यासाठी जो चबुतरा उभारला आहे त्या सगट मोजायची ? हा मुख्य मुद्दा आहे.एवढ्या अफाट आणि अवाढव्य पुतळ्याची काय गरज होती,त्यातून काय साध्य होणार ? कोणते जनहित साधले जाणार ? स्टॅचू ऑफ युनिटी म्हणजे ‘एकतेचे प्रतीक’असे नामाभिधान या पुतळ्याला देण्यात आले आहे.देशात सोडाच गुजरात मध्ये जिथे हा पुतळा उभा केला आहे तिथे कोणत्या बाबतीत एकतेचा संदेश अनुसरला जातो ? हा प्रश्न आहे.नसेल तर हा पुतळ्याचा सोस कशासाठी ? पुन्हा हा पुतळा आमच्या देशातल्या अभियंत्यांनी नाही तर चीन मधून बनवून आणला आहे.सरदार पटेलांचा एकतेचा संदेश देणारा पुतळा जर आम्हाला एका पारंपरिक शत्रू देशाकडून बनवून घ्यावा लागत असेल,तो ही असा देश जो कायम काही ना काही कुरापती काढून आमच्या एकता आणि अखंडतेला कायम धक्के देत असतो.तर या पेक्षा त्या महापुरुषाची आणि आमच्या देशाची शोकांतिका आणखी काय असू शकते ? माणसाच्या विचारापेक्षा त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्याची आणि त्या भट्टीत आपले स्वार्थाचे वांगे भाजून घेण्याची जी पुरोहितवादी मनोवृत्ती असते त्याचेच हा पुतळा एक प्रतीक असून ‘एकता’फक्त नावापुरतीच आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

       शिवस्मारकाचे काय ? 


महाराष्ट्रातल्या राजधानी मुंबई जवळच्या अरबी समुद्रातील एका बेट वजा खडकावर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.हे स्मारक देखील जगातले सर्वात उंच स्मारक असेल असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे संकल्प चित्र आतापर्यंत जवळपास पाच ते सहा वेळा बदलले असून हे काम ‘एल अँड टी’नामक ब्रिटिश कंपनीला दिले आहे.किती विपरीत विसंगती आहे पहा ? म्हणजे ज्या फिरंग्यांच्या आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करण्या करीता छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली,त्या दूरदृष्टी आणि दृष्टेपणाचे स्मृतिस्थळ म्हणून आम्ही हे स्मारक उभारत आहोत त्याचे बांधकाम जर एक ब्रिटिश कंपनी करत असेल तर या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट आणखी दुसरी काय असू शकते ? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला स्वाभिमानाने जगायला शिकवले आणि आम्ही असे दळभद्री की त्यांचेच स्मारक ब्रिटिशांकडून करून घेत आहोत,ज्या ब्रिटिशांनी आपणाला दीडशे वर्ष लुटले.स्वातंत्र्य तर मिळाले मात्र आमची मानसिक गुलामगिरी अजून कायम आहे,ती तशीच कायम राहणार असेल तर शिवाजी महाराजांचा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा ठरला तरी काय कामाचा ? आणि इतका उंच पुतळा मान वर करून बघण्या एवढं पाठबळ शिवबांच्या रयतेत  मावळ्यांत उरलाय तरी का ? कंबरडं मोडलेली रयत काय पुतळा पाहणार ? आम्ही तर या बाबत आधीच म्हटले होते की खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील जनतेचा पैसा असा इमले महाल राजवाडे इमारती आणि स्मारकासाठी खर्च करणे पसंद नव्हते.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका बाबत सरकार काही बाबी दडवत आहे.पर्यावरण विभाग आणि नेव्ही कडून स्मारकासाठी ना हरकत मिळणे बाकी आहे.आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचाही अडचण आहे.शिवाय स्मारकाचे पूर्वीचे ३७५० कोटीचे बजेट घटवून ते २५०० करण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती आहे. पुतळ्याची उंची कमी करून तलवारीचे टोक ते चबुतऱ्याचा पायथा अशी उंची मोजण्याची नवी मापन पद्धत फडणवीसांनी संशोधित केली असून त्या नुसार छत्रपती शिवरायांचा पुतळा  २१२ मीटर उंच असणार आहे,म्हणजेच सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा ३० मीटर अधिक उंच ! अर्थात ही उंची प्रस्तावित,म्हणजे अजून कागदावर आहे.

स्टॅचू ऑफ इक्वालिटी 


दादर जवळील इंदू मिलच्या साडेसात एकर जागेवर उभारण्यात येणारा भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा  १०६ .६८  मीटर मीटर उंच असणार आहे.म्हणजेच गुजरात मधील सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा ७५ मीटर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा १०६ मीटर कमी.स्मारकांच्या आराखड्यावर स्पष्ट नोंदी असताना आणि त्यात उंचीतली तफावत स्पष्ट दिसत असताना तिन्ही पुतळे जगातले सर्वात उंच पुतळे असणार असा दावा कसा केला जातो ? बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला एकतेचे प्रतीक महान असताना त्यांच्या जनतेत मात्र फाटाफूट करण्याचे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे.विचारणा संपवून महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार असतील तर त्याचा उपयोग केवळ राजकारणाचे बाहुले म्हणून होईल.किंबहुना तसे करण्यासाठीच ही स्मारके उभारण्याचे ढोंग हे सरकार करीत आहे.
Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *