लोकमंच

माध्यमांनी जबाबदार झाले पाहिजे

 अभिनेत्री कंगना रणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामीच्या विरोधात राज्य विधिमंडळात हक्कभंगाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. दोघेही वादग्रस्त. दोघेही उघड उघड मोदी सरकारचे समर्थक. त्यांची तशी भूमिका असण्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण, असं करत असताना ज्या स्वरूपात दोघेही विरोधी पक्षांवर आणि उदारमतवादी लोकांवर अशोभनीय भाषेत टीका करतात ते आक्षेपार्ह आहे. कलाकारांकडून आणि पत्रकारांकडून वस्तुनिष्ठ भूमिकेची अपेक्षा असते. पत्रकारांनी तर कायम विरोधी पक्षात असल्यासारखी भूमिका घेतली पाहिजे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे.कंगनाने  मुंबई, महाराष्ट्राच्या विरोधात चालवलेली मोहिम असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारां सारख्या राजकीय नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुद्दा असो. मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांनीच नव्हे तर सगळ्यांनी निषेधच करायला हवा.टीव्ही अँकरनी, खरंतर गोंगाटाशिवाय चर्चा घडवून आणली पाहिजे. पण, अर्णबने त्याला गोंगाटचं स्वरूप दिलं. चर्चेसाठी बोलाविण्यात आलेल्या तज्ञांपेक्षा स्वतः अधिक बोलायचं आणि इतरांना बोलण्याची संधी न देण्याची नवीन ‘परंपरा’ त्यांनी सुरू केली. सत्ताधाऱ्यांना प्रश्न न विचारता विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्याचा अजब पायंडा त्याने पाडला. जोरात बोलून युद्धासारखं वातावरण निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. अशा वातावरणात सत्याचा सगळ्यात आधी बळी घेतला जातो.  माध्यमांनी स्वत:च आत्मपरीक्षण करण्याची. माध्यमांनी स्वत: काही नियम बनविण्याची आवश्यकता आहे. भारतीय पत्रकारितेचा मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे, हे विसरता कामा नये आणि ‌त्याला पुढे नेण्याची जबाबदारी तरुण पत्रकारांवर आहे.
-रुस्तुम नागरे